राजकारण

परमबीर सिंगांवर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा नव्याने आरोप; पोलीस अधिकाऱ्याचे गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्यानं गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळं त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. परमबीर सिंग यांच्यावरील हे आरोप हजारो कोटींच्या घोटाळ्याचे असून, त्यांच्या कुटुंबीयांचाही यात समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याबाबत पत्र पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

परमबीर सिंग यांच्यावर नव्यानं करण्यात आलेले हे आरोप अकोल्याच्या पोलीस निरीक्षक पदावरील एका अधिकाऱ्यानं केले आहेत. परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हा पैसा परमबीर सिंह यांनी विविध ठिकाणी गुंतवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यापूर्वीही परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणारं एक पत्र समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर हा मोठा आरोप करण्यात आल्यानं सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या पोलीस अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रामध्ये परमबीर सिंह यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांवरही आरोप केले आहेत. भ्रष्टाचारात त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्या पत्नीचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. त्या ठिकाणी त्यांनी हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय करतो. त्या ठिकाणीही या भ्रष्टाचाराचे पैसे गुंतवण्यात आल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्यानं केला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवलं आहे. तसंच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागालादेखील पत्र पाठवण्यात आलं आहे. यापूर्वी मुंबईतील पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळं एकापाठोपाठ एकच्या आरोपांमुळं आता परमबिर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button