राजकारण

जिलेटीनच्या कांड्यांचे नागपूर कनेक्शन शोधा

परमबीर सिंगांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी

सांगली : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला. परमबीर सिंग यांचा पत्रापेक्षा मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन घटना जास्त महत्त्वाच्या असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील सुरू असलेल्या घडामोडींवर जयंत पाटील म्हणाले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी कोणी ठेवली, त्यात जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या, या जिलेटिनच्या कांड्या नागपूरहून आल्या तर त्या नेमक्या कशा उपलब्ध झाल्या, मनसुख हिरेन प्रकरणात काय घडलं, हे राज्याच्या जनतेसमोर आणणे सध्या महाविकास आघाडी सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल, असे वक्तव्यही पाटील यांनी केले.

स्फोटकांच्या प्रकरणात गेल्या चार दिवसांपासून संशयाची सुई ज्या दिशेने जात होती. त्यातून कुठेतरी लक्ष हटवण्याचा प्रयत्न होतो आहे का?, असा प्रश्न उपस्थित करताना अशा पत्राने काहीही फरक पडणार नाही. या सर्व घटनांच्या मुळाशी जाण्याचे आमच्या सरकारने ठरवले आहे आणि त्यावर सरकार ठाम आहे, असेही पाटील म्हणाले. पत्रासोबत परमबीर यांनी चॅटही पुरावा म्हणून जोडलं आहे. त्याकडे लक्ष वेधले असता चॅट ठरवूनही केलं जाऊ शकतं, असे पाटील म्हणाले. हे पत्र का लिहिलं. हे पत्र लिहून कुणाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे का, हेसुद्धा तपासावे लागणार आहे, असेही पाटील पुढे म्हणाले. गेल्या काही दिवसांतील घटनांचा व या पत्राचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. सरकार भक्कम आहे आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button