मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये विनोद तावडेंचे प्रमोशन

मुंबई: भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी आज काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. भाजपनं महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांना महाराष्ट्रासाठी विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्री करत असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय बिहारसाठी ऋतुराज सिन्हा, झारखंडसाठी आशा लाकडा यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. पश्चिम बंगालसाठी भारती घोष यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून आणि शहजाद पुनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं विनोद तावडे यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यानंतर ते काही काळ बाजूला गेल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर विनोद तावडे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केल्यानंतर त्यांच्याकडे हरियाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय महामंत्री करत भाजपनं पुन्हा एकदा बळ देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची नियुक्ती महत्त्वाची असल्याचं बोललं जातंय.
अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला, संघाच्या मुशीत घडलेला अत्यंत महत्त्वाकांक्षी, तेवढाच बुद्धिमान आणि धूर्त नेता म्हणून विनोद तावडे यांची ओळख आहे. विनोद तावडे यांनी 1985 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. यानंतर विनोद तावडे यांनी एकएक पायरी चढत महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.



