Top Newsराजकारण

हा तर दसऱ्यालाच शिमगा; चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे दशहरा मेळाव्यात महाराष्ट्राच्या प्रश्नांना हात लावतील असे वाटले होते. पण ता भाजपवर बोलले. त्यांचे भाषण म्हणजे त्यांनी दसऱ्यालाच शिमगा केल्याची बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली आहे. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या प्रश्नांना हात लावतील असे वाटले होते. महिलांवरील अत्याचार वाढत चालले, त्याबद्दल काय करणार ते सांगतील असे वाटले होते, पण त्यांनी केवळ पुसट उल्लेख केला. महिलांसाठीचा कायदा का पेंडिंग आहे ते सांगितले नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश चालू त्यावर काय करणार आहे, सांगितले नाही. शेतकऱ्यांना दहा हजार कोटी दिल्याची शेखी मिरवता मग त्याची फोड मांडा, कशाला काय दिले, रस्ते दुरुस्त करणे व धरणे दुरुस्त करण्यास दिले तर त्याचा शेतकऱ्याला काय फायदा, असा सवालही पाटलांनी उपस्थित केला.

स्वातंत्र्य लढ्यात कोठे होता असे विचारता. १९२५ मध्ये संघाची स्थापना झाली. प. पू. हेडगेवार हे क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी त्यांनी काही वर्षे संघ स्थगित ठेवला. मी लढ्यात उतरणार, तुम्ही उतरा असे स्वयंसेवकांना सांगितले. स्वातंत्र्यानंतर संघाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. पण आणीबाणीत तुम्ही कोठे होता. इंदिरा गांधींनी लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला, हजारो पत्रकारांना – लाखो स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले, त्यावेळी तुम्ही इंदिरा गांधींशी तडजोड केली. तुम्ही आज ‘भारत माता की जय’ची चेष्टा केली, ‘वंदे मातरम’ची चेष्टा केली. मुंबईत सैन्याचे संग्रहालय करणार म्हणून सांगितले, मग अरबी समुद्र शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे गेल्या दोन वर्षात काय झाले सांगा, असे आव्हानही चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिले.

आता खूप हिंदुत्व आठवू लागले, पण सहकारी पक्षाला विचारले का हिंदुत्वावर बोलणार आहे. सत्तेवर येताना सहकारी पक्षांनी आक्षेप घेतला म्हणून आघाडीतून शिव शब्द काढला. सत्तेसाठी हिंदुत्व बाजूला ठेवले. वारंवार बाबरी मशिद पाडण्याचे श्रेय घेता, पण एक तरी शिवसैनिक तेथे होता का? स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, कोणी याची जबाबदारी घेणार नसेल तर मी घेईन. पण राम मंदिराच्या उभारणीसाठीची धग मनामनात कोणी निर्माण केली तर संघाने निर्माण केली. संघापासून प्रेरणा घेणाऱ्या विहिंपने केली. हा लढा संघाने जनतेपर्यंत पोहचवला, त्यावेळी सैनिक कोठे होते? प्रत्यक्ष अयोध्येत तीन वेळा संघर्ष झाला त्यावेळी सैनिक कोठे होते? बाळासाहेब ठाकरेंच्या आधारावर बाबरी मशिद तुम्हीच पाडली आणि राम मंदिर पण तुम्हीच बांधले म्हणणार का? असा सवाल केला.

आम्ही शब्द पाळला नाही म्हणाले, जर एवढी विचारांची चाड असती जर भाजपने दगा दिला वाटते तर तुम्ही कोणाबरोबरच गेला नसता आणि पुन्हा निवडणुकीची वेळ आणली असती. शेतकऱ्यांच्या समस्या, साखरधंदा अडचणीत, सोयाबीनचे भाव पडले, कर्जमाफी, प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्यांना मदत या कशावरही बोलले नाहीत. शिवसेनेने हिंदुत्वासाठी कधी लढे दिले, राम मंदिरासाठी काय केले, बाळासाहेबांनी एक वाक्य म्हटले त्यावर किती दिवस बोलणार, असा सवालही पाटलांनी केला.

सेना भाजपजवळ येण्याचा विषयच नाही, भाजप राष्ट्रवादीसोबत येण्याचा विषय नाही. आम्हाला सत्तेवर जाण्याची घाई नाही. आम्ही आमच्या टर्मवर चालणारे आहोत. भाजप प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करेल. रोहित पवारांनी भगवा झेंडा उभा केला. आज उद्धवजींनी हिंदुत्वावर पूर्ण भाषण केले, संभ्रमच आहे असेही पाटील म्हणाले.

भाजपकडे उमेदवार नाही, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

सध्या केंद्र सरकारकडून छापा काट्याचा खेळ सुरू आहे. छापा टाकायचा आणि काटा काढायचा अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ईडी आणि आयकर विभागाच्या कारवायांवर मोजक्या शब्दांत भाष्य केलं. सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याची भाषा केली जात आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलं. भाजप देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत. यांना इथले तिथले उपरे उमेदवार शोधावे लागतात. भाजपा म्हणजे नुसती प्लॅटफॉर्मवरची गर्दी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजपने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन विविध उदाहरणचं दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंढरपूर आणि आता देगलूरला बाहेरून उमेदवार आणला अशी टीका करता, तर तुमची उमेदवारांची यादी वाचा अब्दुल सत्तार कोठून आले, भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा उमेदवार म्हणून पळविला. तो पराभूत झाला. तेथे आम्ही ज्याला निवडून आणले, त्याला तुम्ही जागावाटपात जागा घेतल्यानंतर आमचा सिटिंग खासदार घेतला. तुम्ही शिवसेनेच्या ३०-३५ जागांवर भाजपाचे उमेदवार घेतले. गौरव नायकवाडी, कोरेगावचे महेश शिंदे, अशी मोठी यादी आहे. जागा सेनेची पण उमेदवार भाजपाचा असे घडले. तेव्हा आम्ही चुकीचे म्हटले नाही, असा निशाणा चंद्रकांत पाटील यांनी साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button