१५ फेब्रुवारीला नागपुर मुंबई विमान प्रवास केला, गृहमंत्र्यांची कबुली
जनतेत चुकीची माहिती पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न
मुंबई : भाजपच्या आरोपांवर स्पष्टीकरण देतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपण १५ फेब्रुवारीला नागपुर मुंबई प्रवास केल्याची कबुली दिली आहे. नागपुर येथे ५ फेब्रुवारीला मी कोरोनाबाधित झालो होतो. त्यानंतर ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान मी नागपूरच्या एलिक्झर रूग्णालयात दाखल होतो. जेव्हा मला १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला तेव्हा मी खासगी विमानाने नागपूर ते मुंबई प्रवास केल्याचे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिली आहे. होम क्वारंटाईन नंतर मी कामाला लागलो. राज्याचे अधिवेशन असल्याने मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कामाला सुरूवात केली. अधिवेशनाच्या लक्ष्यवेधी आणि प्रश्नोत्तरांसाठी मी कामाला लागलो होतो. मुंबईतल्या ज्ञानेश्वरी घरातून मी पहिल्यांदा २८ फेब्रुवारीला घराबाहेर पडलो अशी कबुलीही अनिल देशमुख यांनी दिली आहे. जनतेत माझ्याबद्दलची चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचे ते म्हणाले.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेब्रुवारी महिन्यात पंधरवड्यानंतर एपीआय सचिन वाझे यांना बोलावून बार, रेस्टॉरंटकडून १०० कोटी रूपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते. पण या कालावधीत अनिल देशमुख हे कोरोनामुळे १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान होम क्वारंटाईन असल्याचा दाखला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. पण क्वारंटाईन असलेले अनिल देशमुख हे माध्यमांना कसे सामोरे जातात असा सवाल करत भाजपने शरद पवारांच्या प्रमाणपत्रावर प्रश्न केला होता. दरम्यान अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीलाच विमान प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. समाजमाध्यमांवर अनिल देशमुख यांनी हवाई प्रवास केल्याचे एक डॉक्युमेंट व्हायरल झाले आहे. या डॉक्युमेंटमध्ये अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीलाच प्रवास केल्याची माहिती आहे.
परमबीर सिंह यांच्या पत्रात मात्र गृहमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगल्यात एपीआय सचिन वाझे यांना १५ फेब्रुवारीनंतर बोलावल्याचा उल्लेख आहे. सचिन वाझे यांना अनिल देशमुख बार आणि रेस्टॉरंटकडून १०० कोटींचे टार्गेट दिल्याचेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे. या टार्गेटसाठी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना अनेकदा बोलावून वारंवार याबाबतचे आदेश दिले होते असा उल्लेखही पत्रात आहे. १५ फेब्रुवारीनंतर जेव्हा अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना बोलावले होते, तेव्हा गृह विभागातील मंत्र्यांचे दोन कर्मचारीही त्याठिकाणी होते. त्यामध्ये देशमुख यांचे स्वीय सचिव पालांडे हेदेखील उपस्थित असल्याचा उल्लेख आहे. त्याचवेळी सचिन वाझेंना १०० कोटींचे टार्गेट देण्यात आले. मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट तसेच इतर आस्थापना आहेत. प्रत्येक २ लाख ते ३ लाख या प्रमाणे वसुली करण्याचे आदेश सचिन वाझे यांना देण्यात आले होते.