Top Newsआरोग्य

कोरोनाचा विस्फोट : राज्यात नवी नियमावली जाहीर

कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांची १० जानेवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. रोजीरोटी बंद करायची नाही पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी करू नका, कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. तसेच नियम धुडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. मी स्पष्ट करतो की, आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातला कुणीही घटक असो प्रत्येकानं आता ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयानं आरोग्याचे नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे.

मी गेल्या दोन वर्षांपासून पाहतोय, राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ आणि ‘मिशन बिगीन अगेन’च्या माध्यमातून वेळोवेळी नियमावल्या केल्या आणि अंमलात आणल्या. आरोग्याचे नियम पाळण्यात बहुतांश नागरिक उत्सुक होतेआणि आहेत आणि ते पाळतात सुद्धा पण काही मूठभर लोकांच्या नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळं आणि बेजबाबदार वागण्यामुळं प्रश्न निर्माण होतो. हे यापुढे चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना, आणि पोलिसांना दिले आहेत. हे सर्व आपल्या भल्यासाठीच आहे, लवकर या विषाणूच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी आहे हे लक्षात घ्या.

आज आरोग्य यंत्रणेवर ताण यायला सुरुवात झाली आहे हे नाकारता येत नाही. रुग्ण संख्या याच वेगानं वाढली तर सहव्याधी असलेल्या किंवा अद्याप लस न घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात दाखल करावं लागून ऑक्सिजनची मागणी देखील वाढू शकते . आज अनेक ठिकाणी आपले डॉक्टर्स, परिचारिका ,वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइनर्स हे विषाणूच्या संसर्गामुळं आजारी पडलेले दिसत आहेत. हा आपल्यासाठी इशारा आहे. आपल्याकडे साधन सामुग्री पुरेशी आहे. दोन वर्षात आपलं सुविधांमध्ये वाढ केली आहे पण डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? हे आव्हान आपल्याकडेच आहे असे नाही तर देशात इतरत्र आणि काही देशांत देखील यामुळं समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं माझे अतिशय कळकळीचे आव्हाहन आहे की नियम पाळा, सरकारने घालून दिलेले निर्बंधांना तोडू नका सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही धोका न पत्करता थोडी जरी लक्षणे आढळली तर आपल्या डॉक्टर्सना दाखवा किंवा त्यांचा सल्ला घ्या.

आपण शाळा- महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळं आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असं समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका असेही आवाहन मी माझ्या तरुण मित्रांना करतो.

या सगळ्यामध्ये लसीकरण फार आवश्यक आहे. अजूनही लस घेतली नसल्यास लगेच घ्या. आज या विषाणूची तीव्रता आपल्याला जाणवत नसेल किंवा मृत्यू दर कमी असेल तर तो केवळ लसीकरणामुळे आणि सतत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सवयीमुळे आहे हे लक्षात ठेवा. काही जिल्ह्यांत लसीकरण पुरेसं झालेलं नाही, तिथं रुग्ण संख्या अधिक वाढून रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचं प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे लसीकरण कमी असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्याचा पर्याय देखील सरकारकडे आहे, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

नवी नियमावली जाहीर, असे आहेत नवे नियम

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी १० जानेवारीपासून होणार आहे. तसेस हे निर्बंध १५ फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील, असे राज्य सरकारने जाही केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नव्या नियमावलीनुसार राज्यात सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी, रात्री ११ ते सकाळी ५ संचारबंदी लागू राहणार आहे. त्याबरोबरच सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमधून प्रवास करण्यासाठी दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे.मात्र लोकल वाहतुकीवर कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाही. तसेच राज्यातील शाळा आणि महाविद्यालये हे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

– राज्यात सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी, रात्री ११ ते सकाळी ५ संचारबंदी
– शाळा महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
– मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद
– स्विमिंग पूल, जिम, स्पा पूर्णपणे बंद
– लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत
– खासगी कार्यालयात २ डोस घेतलेल्यांनाच परवानगी
– २ डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक सेवेचा लाभ घेता येणार
– रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेनं रात्री १० पर्यंत सुरू
– लग्नाला ५०, तर अंत्यविधीला २० जणांनाच परवानगी
– सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त ५० लोकांची उपस्थिती

सरकारी कार्यालयांसाठी

– लेखी आणि स्पष्ट परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात लोकांना प्रवेश नाही
– व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन नागरिकांशी संवाद राखणे
– एकाच कॅम्पसमधील किंवा बाहेरुन आलेल्यांसाठी व्हिडीओ कॉन्फरिन्सिंगद्वारे संवाद
– कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन देणं, तसंच कार्यालयाच्या सोयीनुसार त्यांच्या कामाच्या तासात बदल करणे
– थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे

खासगी कार्यालयांसाठी

– खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीची मर्यादा
– कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश, लस घेतले नसलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे
– कर्मचाऱ्यांकडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे याची काळजी घ्यावी
– थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button