Top Newsराजकारण

…तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा; सोमय्यांचे ठाकरे सरकारला आव्हान

रत्नागिरी: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सीआरझेडचं उल्लंघन करून बंगला बांधला असेल तर त्यावर कारवाई करा, असं आव्हानच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे.

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आव्हान दिलं. अनिल परब यांच्या बंगल्याबाबत बोलता नारायण राणेंच्या बंगल्याबाबत का बोलत नाही? असा सवाल मला केला जातो. राज्यात सरकार कुणाचं आहे? कोस्टल झोन ऑथोरिटी पर्यावरण खात्याकडे आहे. त्याचे मंत्री आदित्य ठाकरे आहेत. त्यामुळे मग राणेंनी काही चुकीचं केलं असेल तर करा कारवाई. पुरावे असतील तर पुढे जा, असं सांगतानाच तुम्ही कारवाई करत नाहीत. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि राणेंमध्ये सेटिंग झाली आहे का? असा सवाल सोमय्या यांनी केला. राणेंवर ठाकरे आणि परब यांनी आरोप केले आहेत. त्याबद्दल त्यांनाच विचारा असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे सरकारचा उजवा हात अनिल परब यांचे रिसॉर्ट केव्हा पाडणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडण्याचे निर्देश दिले होते. रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये या संदर्भात सुनावणी होणार आहे. त्यावेळी हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकायुक्तांकडे ही सुनावणी आहे. किरीट सोमय्या सांगतात ते खरं आहे असं राज्य सरकारने सांगितलं आहे. अनिल परब यांनी खोट्या पद्धतीने एनए केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची भेट झाली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

अकृषी परवाना गैरकायदेशीर रित्या करण्यात आला होता. प्रत्यक्ष १७०० चौरस मीटर बांधकाम करण्यात आलंय. अनिल परब खोटारडे आहेत. चिटर आहेत. त्यांनी सरकारची फसवणुक केली आहे. सदानंद कदम यांना शेती जमीन म्हणून विकलीय. पर्यावरण मंत्रालयाने सेटेलाईट मॅपमध्ये बांधकाम मे २०१७ नंतर सुरु झाल्याचं सांगितलं आहे. अनिल परब यांनी रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी २० मार्च २०२० रोजी घेतले होते. परब यांनी महावितरणकडून आपला रिसॉर्ट बांधकाम पूर्ण करण्यासाठी थ्री फेज कनेक्शन घेतले होते. संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असताना परब यांनी रिसॉर्ट बांधायला घेतला होता, असंही त्यांनी सांगितलं.

आदित्य यांनी मेट्रोची वाट लावली

यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रोची वाट लावली. पर्यावरण मंत्रालयाने पाच महिने आदेश देवून बेकायदेशीर रिसॉर्ट का पाडलं जात नाही? असा सवाल त्यांनी केला. सदानंद कदम यांच्या अकाऊंटमधून ५ कोटी रुपये रिसॉर्टसाठी खर्च केले आहेत असं सीएचं पत्र आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button