नवी दिल्ली : नीती आयोगानं सरकारला तिसऱ्या लाटेबद्दलचा अहवाल सरकारला दिला आहे. या अहवालाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. देशाला भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं लागेल, असा धोक्याचा इशारा नीती आयोगानं दिला आहे. तिसरी लाट टोक गाठेल त्यावेळी देशात दररोज ४ ते ५ लाख रुग्ण आढळून येतील. त्यामुळे दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवावे लागतील. देशाला ५ लाख ऑक्सिजन बेड आणि १० लाख आयसोलेशन केअर बेडची गरज लागेल, असा अंदाज नीती आयोगानं वर्तवला आहे.
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरली आहे. देशातील जवळपास सगळ्याच राज्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. बाजार, आस्थापनं सुरू करण्यात आली आहेत. लसीकरणाचा वेग वाढवण्याचं कामदेखील सुरू आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. याबद्दल नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी गेल्याच महिन्यात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही शिफारशी केल्या आहेत. त्यांनी महत्त्वाची आकडेवारीदेखील सरकारला दिली आहे.
सप्टेंबर २०२० मध्ये नीती आयोगानं दुसऱ्या लाटेचा अंदाज नीती आयोगानं नोंदवला होता. यानंतर एप्रिल, मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. मेच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोनाची नोंद झाली. एप्रिल-जूनमध्ये दिसलेल्या पॅटर्नवरून नीती आयोगानं तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. १ जूनला देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १८ लाख होती. २१.७४ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली होती. तर २.२ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करावं लागतं.