भारतातील ‘बायोलॉजिकल ई’ कंपनी करणार लस निर्मिती

नवी दिल्ली : भारतातील ‘बायोलॉजिकल ई’ या संस्थेकडून जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या कोरोना लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. सोबतच या कंपनीकडून त्यांच्या वेगळ्या कोरोना लसीचीही निर्मिती केली जाणार आहे. ‘बायोलॉजिकल ई’च्या कार्यकारी संचालकांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती दिली. त्यांच्या या निर्णयामुळं भारतात जाणवणारा लसींचा तुटवडा आणि पुरवठा यावर तोडगा निघण्यास मदत होणार आहे.
‘बायोलॉजिकल ई’ ही दक्षिण भारतातील हैदराबाद येथील संस्था आहे. या संस्थेकडून ऑगस्ट महिन्यापासून दर वर्षी ७५ ते ८० मिलीयन लसींची निर्मिती करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. ही लस ह्युस्टनमधील बायलर कॉलेज ऑफ मेडिसिन आणि डायनावॅक्स टेक्नॉलॉजीज कॉर्प यांच्या प्रयत्नांतून तयार करण्यात आल्याची माहिती आहे. २०२२ हे वर्ष संपण्यापूर्वी १ बिलीयन लसींची निर्मिती करण्यासाठी ‘बायोलॉजिकल ई’ या संस्थेला अमेरिकेकडूनही अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचं कळत आहे.
सध्याच्या घडीला भारतात कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचा डोस नागरिकांना देण्यात येत आहे. यातच काही दिवसांपूर्वीच रशियाच्या स्फुटनिक या लसीच्या डोसची पहिली खेपही भारतात पोहोचली आहे. त्यामुळं आता ही लसही भारतीयांना देण्यात येणार आहे. असं असलं तरीही भारतातील लोकसंख्या पाहता लसींचा तुटवडा जाणवत असल्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांना लसीकरण मोहिमेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच परिस्थितीमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनची लस आमि बायोलॉजिकल ई. ची लसही वापरात आल्यास देशातील लसीकरण प्रक्रियेला नक्कीच वेग मिळेल.
‘दोन्ही लसींच्या निर्मितीसाठीच्या पायाभूत सुविधा आणि प्लांट वेगळे असणार असून, प्रत्येक लस स्वतंत्र पातळीवर तयार केली जाणार आहे’, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता लसीच्या निर्मितीसंदर्भात हे पाऊल उचललं गेलं आहे.




