गेली वीस वर्षे अफगाणिस्तानमध्ये लोकशाहीची स्थापना करून तिच्या रक्षणार्थ असणारे अमेरिकन सैन्य माघारी जाताच ठरल्याप्रमाणे इस्लामी मूलतत्त्ववादी तालिबानी लोकांनी अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतला. हा प्रकार रातोरात घडला असेल यावर कुणी भरोसा ठेवायला तयार नाही. अमेरिकेत सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारची धोरणे बदलली यावरही विश्वास ठेवता येत नाही कारण अमेरिकेचे तालिबान प्रेम यापूर्वी जगाने अनुभवले आहे. बायडन यांनी केलेली वक्तव्ये पाहता तालिबानी शक्तींना नियोजनपूर्वक ही सत्ता सोपवण्यात आल्याचे वाटते.
तालिबानी या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी. जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशातील विद्यार्थी एवढा क्रूर असू शकत नाही. मग हे विद्यार्थी काय शिकले असतील? हे विद्यार्थी आहेत धार्मिक शिक्षणाचे, मदरसा शाळांमध्ये जे शिकवले जाते त्याच्या बळावर हजार-पंधराशे वर्षांपूर्वी जी शिकवण धर्माने दिली त्यावर आजही कायम असण्याचा आग्रह ज्यांचा आहे ते आजचे अफगाणिस्तानमधील कट्टर लोक स्वतःला विद्यार्थी म्हणजे तालिबानी समजतात हे विचित्र आहे. इस्लाम धर्मात दिलेल्या आज्ञा कदाचित त्या काळाची गरज असतीलही, कारण जगातल्या सर्व धर्म ग्रंथात जे तत्त्वज्ञान मांडले आहे ते त्या त्या काळाची गरज म्हणून मांडलेले असते.
नंतरच्या अनुयायांनी काळाच्या कसोटीवर त्यातल्या तत्त्वज्ञानाचा विचार करीत पुढे चालायचे असते. मात्र, धार्मिक क्षेत्रात असे घडताना दिसत नाही. आपल्या देशातही हीच तालिबानी प्रवृत्ती प्रबळ झालेली दिसते. तालिबानी गोंधळाच्या पृष्ठभूमीवर आपल्या देशाचा विचार करायचा झाल्यास त्यांच्यात आणि आमच्यात कोणता फरक आहे याचा विचार केला तर हाती फारसे वेगळे काही लागत नाही. धर्मग्रंथाने दिलेला शब्द तालिबानी प्रमाण मानत असतील तर गेल्या काही वर्षात भारतात काय होतेय याचा विचार केल्यास या दोन्ही प्रवृत्ती सारख्याच असल्याचे जाणवते. इस्लाममध्ये काफिरांना जगण्याचा हक्क नसेल तर भारतात कट्टर लोक मुस्लिमाबाबत वेगळा काय विचार करतात?
तालिबानी झाकावे आणि सनातनी कट्टरपंथी काढावे एवढे साम्य या दोघांच्या विचार आणि कृतीत दिसत असेल तर कोणत्या तोंडाने तालिबानी लोकांचा निषेध करावा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. गुजरातमधील गर्भवती महिलांचे शिरकाण करणार्या कट्टर प्रवृत्ती तालिबानी रक्तपात निषिद्ध कसा ठरवू शकतात हा आमच्यासाठी मेंदू कुरतडणारा प्रश्न ठरत आहे. मनुस्मृती या कालबाह्य पुस्तकातील कचरा उद्याच्या जगण्याचे आदर्श तत्त्वज्ञान म्हणून कुणी स्वीकारत असेल आणि सगळ्यांनी त्याच मार्गावर चालायला हवे याची सक्ती विविध मार्गाने करायला हे लोक सिद्ध झाले असतील तर आपल्या देशातील तालिबानी प्रवृत्तींना माफ कसे करणार?
कोणत्याही देशातल्या कट्टरतेत पहिला बळी स्त्रियांचा जातो. त्यांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावले जाते. त्यांनी कसे जगावे याची नियमावली धार्मिक पुस्तकातील आज्ञा काय आहेत यावरून ठरवले जाते. मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू किंवा अन्य कोणत्याही धर्मात स्त्रियांना मुक्तपणे जगण्याचा अधिकार मिळत नसेल, प्रत्येकाला ती उपभोगाची वस्तू वाटत असेल तर असे काही आपल्यात घडत नसेल तरच इतरांकडे बोट दाखविण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो याचा विसर सध्या भारतीय माणसाला पडलेला आहे. तालिबानी लोकांच्या कृत्यामुळे मानवता काळवंडली असेल तर आपल्यातील कट्टरतेने ती कधी उजळली आहे का हेही बघायला हवे की नको?