मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी माध्यमाशी संवाद साधताना राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर पहाटेच्या शपथविधीवरुन निशाणा साधला.
विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरु होत्या. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या वेळी शपथ घेत सत्तास्थापन केली होती. मात्र, हे सरकार अल्पजीवी ठरलं आणि अवघ्या ८० तासांत ते कोसळलं. या पहाटेच्या शपथविधीला आज २ वर्षे पूर्ण झाली. त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवीन वर्षात हे सरकार जाणार आहे, असं वक्तव्य केलं. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी आधी झोपेतून जागे व्हा, असा टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत अनेकवेळा हे सरकार जाईल असं विधान केलं आहे. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्याने हे सरकारला काही फरक पडत नाही. हे सरकार पुढील अनेक वर्षे टिकेल, असं ते म्हणाले.
पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. बहुतेक त्याच शपथविधीचे झटके पाटलांना बसत असावेत. म्हणून ते सारखं म्हणत आहेत की सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा, एवढंच मी त्यांना सांगेन, असा टोलाही राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय.