Top Newsराजकारण

तीन सदस्यीय प्रभाग रचना काँग्रेसला अमान्य; फेरविचार करण्याची मागणी

मुंबई : आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारच्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. तीन सदस्यीय प्रभाग रचनेला ठाकरे मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. याबाबत लवकरच अध्यादेश काढून राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. परंतु सरकारच्या या निर्णयाविरोधात सत्ताधारी पक्षातील काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचं मत डावललं जातंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सरकार आणि संघटना या दोन बाजू आहेत. संघटना वेगळी आहे आणि सरकार वेगळं आहे. सरकारसमोर आम्ही आमचं मत मांडलं आहे. आता सरकारने विचार करावा. त्रिसदस्यीय प्रभागऐवजी दोन सदस्यीय प्रभाग करावेत ही काँग्रेसची मागणी आहे. आम्ही काँग्रेस म्हणून मत मांडलं आहे. जो काही निर्णय घ्यायचाय तो सरकारला घ्यायचा आहे. सरकारने विचार करावा. द्विसदस्यीय प्रभाग रचनेत योग्यरित्या निवडणुकीचा प्रचार केला जाऊ शकतो. स्थानिकांना त्यात न्याय देता येईल. सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही लोकांची मते मांडली आहेत. त्यामुळे सरकारने आता निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितले आहे.

तर जनतेचे प्रश्न आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ही भूमिका मांडणे काँग्रेसचं काम आहे. अनेक लोकांनी मागणी आहे द्विसदस्यीय प्रभाग व्हावेत. परंतु कॅबिनेटमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळात सर्वांचे मत घेऊन निर्णय घेतला. प्रभाग रचना ही दोन सदस्यीय व्हावी हीच काँग्रेस मागणी आहे असं नाना पटोले म्हणाले. परंतु नागरिकांच्या विकासासाठी सर्व एकमताने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यामुळे या निर्णयावरुन काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचं उघड होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button