राजकारण

शिवसेनेच्या विधानसभा संघटकाची ‘ईडी’ चौकशी

नालासोपारा : शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांची ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ई़डीने दळवी यांची २५ जूनपासून आतापर्यंत चार ते पाचवेळा ईडी कार्यालयात बोलावून चौकशी केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी एचडीआयएलचे मालक राकेश वाधवान यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. प्रमोद दळवी यांच्या चौकशीतून वसई-विरारमधील बांधकाम व्यवसायिकांसह मुंबईतील शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रमोद दळवी हे शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक आहेत. ते वसई विरारसह मुंबईतील बांधकाम आणि हॉटेल व्यवसायिक आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार तथा एन्काऊंटर स्पेशालिस्ट, माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराची धुराही प्रमोद दळवी यांनी सांभाळली आहे.

नोटबंदी काळात २०१६ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक धनंजय गावडे यांना १ कोटी १५ लाखांच्या नव्या नोटांसह इन्कमटॅक्स आणि लोकल क्राईम ब्रँचने पकडले होते. त्या नव्या नोटा प्रमोद दळवी यांच्या घरातून गावडे यांनी घेतल्याचे तपासातून समोर आले होते. याच घटनेत गावडे आणि प्रमोद दळवी यांच्या घरांची दोन दिवस तपासणी देखील झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button