फोकस

मुंबईत समुद्राला उधाण, सकाळपासूनच धो-धो; ११ दिवसांमध्येच महिन्याभराचा पाऊस

ढगांचा गडगडाट; नवी मुंबई, ठाण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग; रस्ते पाण्याखाली !

मुंबई : हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे मुंबई आणि उपनगराच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत आज पहाटेपासूनच जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, गेल्या काही तासांमध्ये ढगांचा गडगडाट आणि पावसाचा जोर आणखीन वाढला आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा खरा ठरताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जून महिन्याच्या सुरुवातीच्या ११ दिवसांमध्येच ५०५ मिमी या मासिक सरासरी एवढ्या पर्जन्यवृष्टीची नोंद झाली आहे.

हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून ट्विट करुन सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्रात दुपारी दीडच्या सुमारास भरती येणार आहे. त्यावेळी समुद्रात तब्बल ४.३२ मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. या काळात पाऊस सुरु राहिल्यास पाण्याचा निचरा होणार नाही. सध्या भरती नसूनही मुंबईतील समुद्र खवळल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काही तास मुंबईच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत. मुंबई , रायगड , ठाणे , पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ३० ते ४० किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांना झाडाखाली उभे राहू नये. तसेच बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जूहू चौपाटीवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली असून समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे. तर, ठाणे, मुंबईकरांनी घरातच थांबावे, लांबचा प्रवास टाळावा, गरज असल्यासच घराबाहेर पडा, असा सल्लाही देण्यात आला आहे. मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पाऊस बरसतोय. तर इस्टर्न एक्सप्रेस हायवे नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढण्यात नागरीकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी भरले असून रेल्वे रुळावरही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. सायन पुलाखाली प्रचंड पाणी साचले आहे. तसेच सायनपासून ठाण्याकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणी राहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अंधेरी फाटक आणि सबवेमध्ये पावसाचे पाणी भरले आहे. या भागात गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने गाड्यांमध्येही पाणी शिरताना दिसत आहे. अंधेरी सबवेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच बीकेसी कोविड सेंटर येथेही गुडघाभर पाणी साचले आहे. हा संपूर्ण परिसर जलमय झाल्याने नागरिकांना घाणेरड्या पाण्यातूनच लसीकरणासाठी जावं लागत आहे.

नवी मुंबईत दाणादाण

नवी मुंबईतही रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे कोपरखैरणे येथील राम सोसायटीत काल रात्री झाड पडल्याने ४ ते ५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. काल रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

ठाण्यात रात्रीपासूनच दमदार

पावसाने सलग तीन दिवसापासून ठाण्याला झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पावसाने अधिकच जोर धरल्याने ठाण्यातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला जाणारी वाहतूक मंदावली आहे. अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

वसई, विरार, नालासोपाऱ्यात रस्ते पाण्याखाली

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात रात्रभरापासून पाऊस कोसळत असल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. नालासोपारा पूर्व, आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, टाकी पाडा, वसईतील गोलानी नाका, एव्हरशाईन, वसंत नगरी सर्कल, गोकुळ सोसायटी, समता नगर, जे बी नगर, विरार पश्चिम, विवा कॉलेज रोड आदी ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. गोकुळ सोसायटीत तर गुडघाभर पाणी साचले असून सोसायटीच्या इलेक्ट्रिक बोर्डपर्यंत पाणी आलं आहे. वसई-नालासोपाऱ्यात आज दिवसभरात पावसाचा जोर कायम राहिला तर हाहा:कार माजू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे

पालघरमध्ये विजाांचा कडकडाट

पालघरमध्येही सकाळापासूनच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पालघरच्या पूर्वपट्ट्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पालघर, मनोर, बोईसर, डहाणू, कासा, विक्रमगड, वाडा परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. येत्या १५ तारखेपर्यंत हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

चार दिवस धोक्याचे

दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत चार दिवस रेड अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाण्यासाठी रविवारी रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आल्याचं मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसळीकर यांनी सांगितलं.

मुंबईतील या पावसामुळे जून महिन्याच्या सुरुवातीच्या ११ दिवसांमध्येच ५०५ मिमी या मासिक सरासरी एवढ्या पर्जन्यवृष्टीची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या ११ दिवसांत ५६५.२ मिमी पर्जन्यवृष्टी नोंदवली गेली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून मिळालेल्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तयारी करण्यास सुरुवात केली आहे. सखल भाग आणि मिठी नदीजवळ राहणाऱ्यांना सुरक्षित जागी हलवण्याची तयारी केली जात आहे. यादरम्यान वॉर्ड कार्यालयांना पडलेले वृक्ष हटवण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button