
मुंबई: राज्याच्या राजधानी मुंबईला पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबईतील काही भागात २०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. नालासोपारा, सायन रेल्वे रुळांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचं दिसून आलं. पुढील २४ तासात मुंबई, पालघर आणि डहाणू येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर ढगांचा कडकडाट आणि वीज देखील कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय जोरदार वारे वाहतील, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी ढगांचा कडकडाट, वीज कोसळणे आणि जोरदार वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Mumbai Rainfall update : pic.twitter.com/FeDNGJunvV
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 17, 2021
मुसळधार पावसामुळे सखल भागातील रस्ते , रेल्वे मार्ग, प्रभावित होऊ शकतात. लोकल सेवाही प्रभावित होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भरतीची वेळ असल्यानं पुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं आहे. जुन्या इमारती अति पावसामुळे कोसळू शकतात, ४५-५५ ते ६० किमी प्रति ताशी वेगानं वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
वसई विरारमध्ये रात्रभर मुसळधार, रस्ते जलमय
वसई विरार भागात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. जवळपास चार तास पडलेल्या पावसाने वसई विरारमधील सर्वच रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सकाळच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली तरीही सर्व परिसर जलमय झाला होता. विरार पूर्व कण्हेर फाटा येथील जाधव पाड्यात अडकलेल्या ८० नागरिकांना पहाटे बाहेर काढले आहे. विरार पूर्व विवा जहांगीड, मनवेलपाडा, विरार पश्चिम विवा जहांगीड, एम बी इस्टेट, नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नगीनदासपाडा, आचोले रोड, संतोष भुवन, वसई एव्हरशाईन, वसंतनागरी हा परिसर पूर्ण जलमय झाला आहे.




