मोटरमनने प्रसंगावधान दाखविल्याने वृद्ध व्यक्ती मृत्यूच्या दारातून परतला !
मुंबई : वाराणसी रेल्वे कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचत असताना एक वृद्ध व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडत असल्याचं मोटरमनला दिसलं. त्यानंतर मोटरमननं समयसूचकता दाखवत आपत्कालीन ब्रेक दाबला आणि वृद्ध व्यक्ती रेल्वेच्या चाका खाली येण्यापासून बचावला. अवघ्या काही सेकंदाच्या फरकानं वृद्धाचा जीव वाचला. रेल्वे वृद्ध व्यक्तीच्या अतिशय जवळ येऊन थांबली. इंजिनाच्या पहिला चाकाजवळ ही व्यक्ती अडकली होती. रेल्वेचे लोको पायलट व सहाय्यक पायलट तातडीनं खाली उतरले आणि संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलं.
वृद्धाचं दैव बलवत्तर म्हणून रेल्वे ऐनवेळी थांबली आणि त्याचे प्राण वाचले. लोको पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यानं दाखवलेल्या समयसूचकतेचं कौतुक केलं जात आहे. यासोबतच स्वत:चा जीव धोक्यात घालून अशा पद्धतीनं रेल्वे रुळ ओलांडू नका असं आवाहन या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा रेल्वेकडून करण्यात आलं आहे.