फोकस

विदर्भात शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या; डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्रांनी सपासप वार

अमरावती : मित्रासोबत बारमध्ये दारू पिण्यास गेलेल्या शिवसेना शहरप्रमुखाची डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर रात्री ५ जणांनी शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार केले.

नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा बसस्थानक जवळील आशीर्वाद वाईन बार समोर रात्री १०.१५ वाजता शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली. अमोल पाटील यांच्यावर या पूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता, तर त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

अमोल पाटील रात्री हा आपल्या एका मित्रासोबत बार मध्ये दारू पिण्यास आशीर्वाद बारमध्ये आला होता. दरम्यान आरोपींनी अमोल पाटील यांच्या हत्येचा आधीच कट रचला होता. सुरुवातीला आरोपींना अमोलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. दरम्यान घटनेविषयी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रिता उईके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी वेगाने चक्र फिरवत काही तासातच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक केली तर एक आरोपी पसार असल्याची माहिती पोलिस निरीक्षण रिता उईके यांनी दिली. अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप रामदास ढोबाळे (वय ४२), प्रवीण रामदास ढोबाळे, प्रवीण उर्फ अविनाश एकनाथ पांडे (वय ३०), रूपेश घागरे (वय २२, सर्व राहणार तिवसा) यांचा समावेश आहे, तर एक जण पसार आहे.

अमोल पाटील यांची हत्या अवैध धंद्यातून झाली असल्याची चर्चा आहे. अमोल पाटील याच्यावर याआधी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्याला या प्रकरणांमध्ये अटकही करण्यात आली होती. कट रचून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करण्यापूर्वी आशीर्वाद बारमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मयत अमोल पाटील याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button