कीव – युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेनची राजधानी कीवसह विविध ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू येऊ लागलेत. कीवच्या क्रूज आणि बॅलेस्टिकवर मिसाइलनं हल्ला करण्यात आल्याचं समोर येत आहे. कीवशिवाय इतर शहरांमध्येही स्फोट झाले आहेत. गुरुवारी सकाळी डोनेट्स्कमध्ये ५ स्फोट झाले. डोनेस्तकला रशियानं स्वतंत्र्य देशासाठी मान्यता दिली होती. यूक्रेनवर लष्करी कारवाई करण्याच्या पुतिन यांच्या आदेशानंतर आता युद्ध सुरु झालं आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, युक्रेन-रशिया युद्ध टाळू शकत नाही. त्यासाठी रशिया स्पेशल मिलिट्री ऑपरेशन लॉन्च करत आहे. युक्रेनच्या सैन्यांनी शस्त्र खाली टाकावीत आणि शरण यावं. त्याचसोबत जो कुणी आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल अथवा आमच्या सैन्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यांनी लक्षात ठेवावं की रशिया त्याचं तातडीनं चोख उत्तर देईल. तुम्ही तुमच्या इतिहासात कधी अनुभवलं नसेल असे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच पुतिन यांनी दिला आहे.
युक्रेनचे विमानतळ आणि लष्करी तळ उद्ध्वस्त
मिसाईलने युक्रेनचे विमानतळ आणि लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे. तसेच ५ विमानं पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे, अशी माहिती एएफपी न्यूज एजेन्सीने दिली आहे. एकाबाजूला रशिया हल्ला करत असले तरी दुसऱ्या बाजूला युक्रेन हार मानण्यास तयार नाही.
रशियान सैन्याच्या कारवाई दरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमीर जेलेंस्की यांनी रशियन भाषेत भाषण केले. या भावुक भाषणात ते म्हणाले की, युक्रेनचे लोकांनी आणि सरकारला शांती पाहिजे. परंतु आमच्यावर हल्ला झाला. आमच्याकडून आमच्या देशाला आणि स्वातंत्र्याला हिसकावण्याचा प्रयत्न झाला. तसेच आमचे आणि आमच्या मुलांचे आयुष्य हिसकावण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही आमचे संरक्षण करणार. जेव्हा तुम्ही आमच्यावर हल्ला कराल तेव्हा तुम्हाला आमची छाती दिसेल, आमची पाठ नाही.
सर्वसामान्यांना निशाणा बनवले नाही – रशियन सैन्य
युक्रेनमधील सैन्याच्या कारवाईवर रशियन सैन्य म्हणाले की, युक्रेनचे विमानतळ, लष्करी तळ यांना निशाणा बनवले आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्राला निशाणा बनवले नाही.
रशियाच्या हल्ल्याला मित्र देशांसह प्रत्युत्तर देणार; बायडन यांचा इशारा
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला अमेरिका आणि मित्र देश एकजुटीने आणि निर्णायकपणे प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिला आहे. अमेरिका नाटो आणि इतर देशांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेने या आधीच युक्रेनला लष्करी मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अमेरिका रशियाविरोधात कोणती पावले उचलणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तातडीने निवेदन जाहीर केले. रशियाने केलेला हल्ला हा विनाकारण आणि अन्यायकारक असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले. अमेरिकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बायडन देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे.
जी-७ ची बैठक होणार
रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मित्र देशांसोबत चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला. ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान या देशांसोबत बैठक होणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा परिणाम आंतररष्ट्रीय स्तरावरही दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सप्टेंबर २०१४ नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरवर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरु राहिल्यास कच्चं तेल आणखी महाग होऊ शकते. या युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारही गडगडला आहे. भारतातही शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला.
आम्ही बचाव करू आणि जिंकू – युक्रेन
‘युक्रेन स्वतःचा बचाव करेल आणि जिंकेल. पुतिन यांनी आदेशाने रशियाने नुकतेच युक्रेनवर आक्रमण सुरू केले आहे. सध्या शांततापूर्ण युक्रेनियन शहरे दडपणाखाली आहेत, हे आक्रमकतेचे युद्ध आहे. जग पुतीनला थांबवू शकते आणि थांबवूच शकते. मात्र, आता कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.