
कराड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलने सर्वच २१ जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीत महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई, भाजप नेते डॉ. अतुल भोसले आणि त्यांचे थोरले बंधू डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी सहकार पॅनेलचेच पुन्हा वर्चस्व सिद्ध झाले. हा निकाल पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार, डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत आणि अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल या तीन पॅनेलचे मिळून ६३ तर ३ अपक्ष असे एकूण ६६ उमेदवार रिंगणात होते. ४७ हजार १४५ मतदारांपैकी मयत मतदार वगळता ९१ टक्के मतदारांनी मंगळवारी मतदान केले. कऱ्हाड येथील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये गुरुवारी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच सत्ताधारी सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चारीमुंड्या चित करण्याच्या इराद्याना उतरलेल्या संस्थापक पॅनेलचे अविनाश कदम आणि रयत पॅनेलचे इंद्रजित मोहिते यांना पराभवाचा धक्का बसला आहे. अविनाश मोहिते यांना ९ हजार ९६१ तर इंद्रजित मोहिते यांना ४ हजार ७५१ मते मिळाली आहे. भाजपाच्या डॉ. अतुल भोसलेंकडून कारखान्याची सत्ता हस्तगत करण्यात पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम या दोन्ही काँग्रेस नेत्यांचे मनसुबे कृष्णेच्या सभासदांनी उधळले असून सहकार संस्थेत राजकारण आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न, निवडणुकीत शेतकरी, शेती, कारखान्यासंबंधी विरोधकांकडे प्रभावी मुद्दा नसल्याने विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे, अशा प्रतिक्रिया सभासद व्यक्त करत आहेत.
या निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. या कारखान्याची सत्ता भोसले गटाकडून दुसरीकडं जावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधक एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि राज्यमंत्री विश्वजित कदम नेतृत्व करत असलेले रयत पॅनेल अशी आणखी दोन पॅनल रिंगणात आल्याने या निवडणुकीची चर्चा खूप झाली. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते.
मतदानही विक्रमी झाले, दिग्गजांचे विधानसभा मतदार संघ या कार्यक्षेत्रात येत असल्याने सगळ्याच नेत्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लक्ष होते. मात्र भोसले गटाने मोठ्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत कृष्णाची सत्ता पुन्हा एकदा मिळवल्याने आता विरोधकांची चिंता वाढली आहे. या निवडणुकीचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवर पडणार हे निश्चित आहे.
सहकारात राजकारण बाजूला ठेवण्याचा संदेश : सुरेश भोसले
ही निवडणुक ऐतिहासिक झाली असून सभासदांनी दिलेल्या मोठ्या मताधिक्यामुळे जबाबदारी वाढली असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. या निवडणुकीत अनेक राजकारणी उतरले होते. सहकारी संस्थेत राजकारण बाजूला ठेवण्याचा संदेश या निवडणुकीने दिले दिला असल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.
शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करणार : अतुल भोसले
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त कृष्णा सहकारी साखर कारखाना राजकारणाचा अड्डा बनवण्याचे षडयंत्र अनेक राजकारण्यांचं होतं मात्र सुज्ञ सभासदांनी तो डाव उधळून लावला असून यापुढील काळात शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर डॉ अतुल भोसले यांनी दिली.




