Top Newsफोकस

मुंबईत ‘आयएनएस रणवीर’ जहाजावर भीषण स्फोट; तीन जवानांना हौतात्म्य

मुंबई – मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे असलेल्या ‘आयएनएस रणवीर’ जहाजावर भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत. दरम्यान जहाजावरील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र जहाजाला फार मोठं नुकसान झालेलं नाही.

ही घटना नेमकी का आणि कशामुळे घडली याची चौकशी केली जाणार आहे. संबंधित घटना ही आयएनएस रणवीरच्या इंटर्नल कंपार्टमेंटमध्ये घडली आहे. या घटनेत साहित्याचं फारसं नुकसान झालेलं नाही. पण तीन धाडसी नौदल जवान या दुर्घटनेत दुर्देवाने शहीद झाले आहेत. तसेच १७ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित घटनेनंतर जहाज चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत बचावकार्याला सुरुवात केली. अखेर त्यांना काही काळाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं. पण तोपर्यंत तीन जवानांचा मृत्यू झालेला होता. खरंतर आयएनएस रणवीर हे जहाज नोव्हेंबर २०२१ पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होतं आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होतं. पण या दरम्यान घडलेल्या घटनेने नौदलात खळबळ उडाली आहे.

आयएनएस रणवीर हे जहाज भारतीय नौदलातील राजपूत श्रेणीच्या ५ सर्वात ताकदवार जहाजांपैकी चौथ्या क्रमांकाचं जहाज मानलं जातं. या जहाजाला १९८६ मध्ये नौदलात समाविष्ट करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर २०१७ साली आयएनएस रणवीर जहाजाच्या वैशिष्ट्याविषयी माहिती जाहीर केली होती. रणवीर श्रेणीतील हे पहिलं विध्वंसंक जहाज असल्याचं नौदलाकडून सांगण्यात आलं होतं. हे जहाज २१ एप्रिल १९८६ रोजी भारतीय नौदलात दाखल झालं होतं. या जहाजाचे विस्थापन ५,००० टन, लांबी १४६ मीटर, बीम १५.८ मीटर आहे. त्यामुळे ते जास्त वेगात सक्षम मानले जाते. या जहाजात ३० अधिकारी आणि ३१० खलाशांचा ताफा असतो. तसेच ते शस्त्रे आणि सेन्सर्सच्या श्रेणीने सुसज्ज असतात. यामध्ये जमिनीवरुन जमिनीवर तसेच जिमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, तोफांचा समावेश असतो, अशी माहिती नौदलाकडून याआधी सांगण्यात आली आहे.

अलीकडच्या काळात जहाजाने विविध फ्लीट सरावांमध्ये भाग घेण्याव्यतिरिक्त रशियासोबतच्या द्विपक्षीय नौदल सरावात भाग घेतला होता. ‘रणवीर’ नावाचा अर्थ युद्धात लढणाऱ्या योद्ध्यांचे शौर्य आणि पराक्रम. जहाजाच्या शिखरावर मध्यभागी एक टोकदार खंजीर असलेली दोन पारंपरिक कुऱ्हाडीसारखी शस्त्रे दर्शविली आहेत, जी प्राचीन काळी भारतात वापरली जात होती, निळे आकाश आणि समुद्राच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर दर्शवली आहेत. आयएनएस रणवीर जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या रेजिमेंट्स आणि इंडियन आर्मीच्या लडाख स्काउट्सशी संलग्न आहे, अशी भारतीय नौदलाकडून माहिती देण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button