नाशिक : राज्यातील शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अशावेळी सत्ताधारी नेत्यांकडून सरकारची उपलब्धी सांगितली जात आहे. तर भाजप नेत्यांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठा दावा करत ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार नक्की येणार, आम्ही शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणं वागणार’, असा दावा दरेकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी म्हणाले जनतेनं आम्हाला आपलं मानलं. पण सरकारनं जनतेला आपलं मानलं नाही. २ वर्षात राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही. यातून मार्ग काढू शकतं ते आमचं सरकार. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे सरकार येणार. कधी येणार तेही आम्ही सांगणार. थोडं शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार, असा सूचक इशारा दरेकर यांनी दिलाय. राज्यात ५ वर्षे देवेंद्र फडणवीसांचा विकासाचा कार्यकाळ आपण पाहिला. भ्रष्टाचाराचा एकही डाग त्या सरकारनं लावून घेतला नाही. आता २ वर्षात महाराष्ट्र २० वर्षे मागे गेलाय. यांच्या अर्ध्या मंत्रिमंडळावर डाग आहेत. ठाकरे सरकारच्या दोन वर्षाच्या काळात चालू प्रकल्प ठप्प झाले. गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आला. ही महाविकास आघाडीची उपलब्धी आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. तसंच चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय नेतृत्व नाराज नाही. ही चर्चा तुमच्याकडूनच ऐकतोय. कोणत्याची प्रकारे नाराजीची चर्चा नाही. जितेंद्र आव्हाड हे वादग्रस्त विधान करुन वातावरण खराब करत आहेत. ते आता मंत्री आहेत. त्यांनी जबाबदारीनं वागावं, असा सल्लाही दरेकर यांनी आव्हाडांना दिलाय.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी भेट दिली होती. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा आणि स्नेहभोजनही झालं. त्यावरुन राज्यात नवं समीकरण आकाराला येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत विचारलं असता, फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट ही वैयक्तिक होती. फडणवीसांना जेवणासाठी आमंत्रण होतं. मनसेसोबत युतीची चर्चा नाही. दोन्ही नेत्यांना भेटलात की विचारा, असं दरेकर म्हणाले. त्याचबरोबर महापालिका निवडणूक आम्ही विकासकामांच्या मुद्द्यावर लढणार, असंही दरेकर म्हणाले.
भुजबळांवर हल्लाबोल
दरेकर यांनी मंत्री भुजबळांवरही गंभीर आरोप केलाय. भुजबळ विनोद बर्वेंना चांगली जबाबदारी देणार म्हणाले होते. हीच जबाबदारी देणार होते का? भुजबळ पालकमंत्री झाल्यावर शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. या प्रकरणात मोक्का, फाशी अशी शिक्षा अपेक्षित आहे. आरोपी बाहेर आला तर कायद्यावर विश्वास राहणार नाही, असं दरेकर म्हणाले. अमोल ईघे यांच्या हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी. विधानसभेतही हा मुद्दा आम्ही उपस्थित करणार. या प्रकरणात तथ्य असेल तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही दरेकर यांनी केलीय.