राजकारण

‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटविण्याची शिवसैनिकांची कृती योग्यच : संजय राऊत

नवी दिल्ली: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन अदानी समुहाने ताब्यात घेतले. यानंतर अदानी समुहाने विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच ‘अदानी एअरपोर्ट’ असा फलक लावला होता. शिवसैनिकांनी हा फलक उखडून फेकला. यानंतर शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केले नाही. ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणे योग्यच असल्याचे सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या कृत्याचे समर्थन केले.

अदानी समुहाने गेल्या काही वर्षांत एव्हिएशन सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील अनेक मोठ्या विमानतळांचे संचालन आता अदानी समुहाकडे आहे. जुलै महिन्यात मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टचे संचालन पूर्णपणे अदानी समुहाकडे आहे. यानंतर अदानी समुहाकडून सदर फलक लावण्यात आला होता. शिवसैनिकांनी या फलकाची तोडफोड केल्याच्या कृत्यानंतर समर्थन देत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

शिवसैनिकांनी काहीही चुकीचे केलेले नाही. शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार करत असेल, शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल जे झाले तेच पुढेही होत राहणार, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव केवळ महाराष्ट्र आणि मुंबईच नाही, तर संपूर्ण जगभरात ओळखले जाते. यापूर्वी येथे जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या होत्या. मात्र, त्यांनी असे कधीही केले नाही. विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असताना जाणूनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम का करत आहात? अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button