सीरमला दणका ! कोवोव्हॅक्स लसीच्या मुलांवरील चाचण्यांना परवानगी नाकारली
पुणे : कोव्हिशिल्डमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिटयूट इन्स्टीट्यूटला मोठा झटका बसला आहे. २ ते १७ वर्षांच्या मुलांवर कोवोव्हॅक्स व्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीला परवानगी न देण्याची शिफारस सरकारी समितीने केली आहे. सीरमने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मुलांवर लसीच्या चाचणीची परवानगी मागितली होती. कोरोनाची तिसरी लाट मुलांना सर्वाधिक प्रभावित करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे लहान मुलांच्या लसीवर वेगाने काम केले जात आहे.
सरकारी समितीने सीरमला ही परनागी देण्यात येवू नये अशी शिफारस केली आहे. ही शिफारस मान्य केली जाईल की धुडकावली जाईल हे आताच सांगणे कठीण आहे. कदाचित सरकारी समितीने नोंदविलेले आक्षेप दूर करण्यासाठी सीरमला सांगितले जाईल. सुत्रांनी सांगितले की, सीडीएससीओच्या कोरोना संबंधीत तज्ज्ञांच्या समितीला असे आढळले की, या लसीला अद्याप कोणत्याच देशाने मान्यता दिलेली नाही.
समितीने सांगितले की, सीरमने मुलांवर कोवोव्हॅक्स लसीच्या चाचणीची परवानगी मागण्याआधी या लसीचे प्रौढांवर झालेले परिणाम आणि चाचण्यांचा डेटा सादर करणे गरजेचे होते. प्रौढांवर या लसीच्या चाचणीची परवानगी डीसीजीआयने दिली आहे. मात्र, या लसीच्या परिणामांचा डेटा सादर न करता सीरमने लहान मुलांवरही चाचणी करण्याची परवानगी मागितल्याने हा आक्षेप घेण्यात आला आहे. दुसरीकडे तिसऱ्या चाचणीचा टप्पा पार केलेल्या झायडस कॅडिलाने डीसीजीआयकडे १२ वर्षांवरील मुलांसाठी डीएनए लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे.