शिक्षण

कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क माफ

मुंबई : राज्यात कोविड-१९ मुळे पालक गमावलेल्या आणि २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्य सरकारने कोरोना काळात कोरोनाच्या संसर्गामुळे पालकत्व गमावलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसेच ज्यांनी कोरोना काळात दोन्ही पालक गमावले आहेत तसेच कोणी कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा स्त्री गमावली आहे. याचा विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रामावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे राज्य सरकारने १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या चालू वर्षाचे शुल्क माफ केले आहे. तसेच इतर शालेय विद्यार्थ्यांच्याबाबतही यापूर्वीच निर्णय़ घेतला आहे.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे हयात पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सदर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे.

यामुळे महाराष्ट्र राज्यातील अशा बाधित विद्यार्थ्यांचे व्यापक हित विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१-२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या अशा नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button