
मुंबई : अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच बारावी परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचं सांगितलं होतं. शिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
याबाबत माहिती देताना काल वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या, बारावीच्या परीक्षांसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली आहे. आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक दोन दिवसांमध्ये होईल. त्यानंतर त्यांची परवानगी आली की आम्ही परीक्षेबाबत निर्णय जाहीर करू. आता या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती असंही वडेट्टीवार म्हणाले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सीबीएसई, आयसीएसई, हरयाणा आणि गुजरात सरकारनं देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्राकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर विचार करुन केंद्रानं सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यापाठोपाठ ‘सीआयएससीई’नेही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता हे सर्वात जास्त महत्त्वाचं असल्याचं सांगत उत्तर प्रदेश सरकारनेही या शैक्षणिक वर्षातल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे.
केंद्राच्या निर्णयानंतर लागलीच गुजरात बोर्डाने देखील राज्यातल्या १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्याच्या फक्त २४ तास आधी गुजरात बोर्डाने बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार १ जुलैपासून बारावी पुनर्परीक्षा आणि बाह्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर गुजरात बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोवा, राजस्थान बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.




