टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार; सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
मुंबई : सध्या ओमायक्रॉन व्हायरसनं जगाचं टेंशन वाढवलं असताना भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत अनिश्चितेचं वातावरण होतं. काही भारतीय खेळाडू या दौऱ्यावर जाण्यास इच्छूक नसल्याच्याही बातम्या होत्या. पण, शनिवारी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी हा दौरा होणार असल्याची घोषणा केली. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन कसोटी व तीन वन डे सामने खेळणार असल्याचं जय शाह यांनी जाहीर केले. या दौऱ्यावर भारतीय संघ ४ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार होते, परंतु ती मालिका नंतर होईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे आता भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं नव वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिंयट सापडल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेसह सर्वच अलर्ट झाले. अशात आफ्रिकेत सुरू असलेली नेदरलँड्सविरुद्धची मालिका स्थगित करण्यात आली. पण, त्याचवेळी भारत ए संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यातली कसोटी मालिका सुरू आहे. अशात भारताचा सीनियर संघ आफ्रिका दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत साशंकता होती. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून बीसीसीआयला खेळाडूंच्या सुरक्षिततेची हमी देण्यात आली आहे. अजूनही बीसीसीआयला केंद्र सरकारची परवानगी मिळाली नसली, तर जय शाह यांच्या घोषणेनं क्रिकेट चाहते आनंदात आहेत.
अजिंक्य रहाणेकडून उपकर्णधारपद काढून घेणार !
भारत-न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत निवड समितीचे सदस्यही दिसले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा संघाची घोषणा लवकरच केली जाईल, अशी शक्यता आहे. अशात फॉर्माशी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेकडून कसोटी संघाचे उप कर्णधारपद काढून घेतलं जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्याची शक्यता अधिक आहे, परंतु लोकेश राहुलचेही नाव चर्चेत आहे.
३४ वर्षीय अजिंक्य सातत्यानं अपयशी ठरतोय. मागील १६ कसोटीत त्याला एकच शतक झळकावता आले आहे आणि त्याची सरासरी ५१.३७ वरून ३९.६० अशी घसरली आहे. २०२०त त्यानं ४ कसोटीत ३८.८६च्या सरासरीनं २७२ धावा केल्या, तर २०२१मध्ये १२ कसोटीत २०.३५च्या सरासरीनं ४०७ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यानं दोन डावांत अनुक्रमे ३५ व ४ धावाच केल्या.