Top Newsस्पोर्ट्स

टी-२० विश्वचषक : अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर तब्बल १३० धावांनी विजय

मुजीब उर रहमानचा विक्रम

यूएई : अफगाणिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात स्कॉटलंड संघावर दणदणीत विजय मिळवला. राउंड १ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद करणारा स्कॉटलंड कडवी झुंज देईल असे अपेक्षित होते, परंतु अफगाणिस्तानं त्यांची हवाच काढली. फलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमान यानं विक्रमी कामगिरी केली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्ताननं २० षटकांत ४ बाद १९० धावा कुटल्या. हझरतुल्लाह झझाई व मोहम्मद शाहजाज यांनी अफगाणिस्तानला दमदार सुरुवात करून दिली. शाहजाद २२ धावा करून माघारी परतला. त्यानंतर रहमनुल्लाह गुर्बाज यानं झझाईला सॉलिड साथ दिली. झझाईनं ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ४४ धावांवर माघारी गेला. गुर्बाजनं ३७ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४६ धावांवर बाद झाला. नजिबुल्लाह झाद्रान यानं वादळ आणलं. त्यानं ५ चौकार व ३ षटकार खेचून ३४ चेंडूंत ५९ धावा चोपल्या. कर्णधार मोहम्मद नबी ४ चेंडूंत ११ धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्तानच्या संघानं स्पर्धेत एका डावात सर्वाधिक ११ षटकार खेचले.

प्रत्युत्तरात स्कॉटलंडचा संघ ६० धावांत तंबूत परतला. स्कॉटलंडचे पाच फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले. मुजीब उर रहमाननं २० धावांत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत डावात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. राशिद खाननं ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर नवीन उल हकनं १ बळी बाद केला. स्कॉटलंडचा संघ १०.२ षटकंच खेळू शकला.

मुजीबसह राशिदच्या फिरकीची जादू

अफगाणिस्तानच्या गोलंदाजानी मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. सर्वोत्कृष्ट म्हणजे मुजीबने ४ ओव्हरमध्ये केवळ २० धावा देत स्कॉटलंडचा निम्मा संघ तंबूत धाडत ५ विकेट मिळवल्या. तर राशिदने २.२ ओव्हरमध्ये ९ धावा देत ४ विकेट मिळवल्या. तर नवीन उल् हकने एक विकेट घेतली. अशा उत्कृष्ट गोलंदाजीमुळे स्कॉटलंडचा संघ ६० धावांवर सर्वबाद झाला. सामन्यात मुजीबला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारताच्या अडचणी वाढल्या

अफगाणिस्तानने या विजयासह भारत असलेल्या ग्रुप २ मध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोघांनी एक एक विजय मिळवला असला तरी अफगाणिस्तानचा नेट रन रेट या मोठ्या विजयामुळे तब्बल +६.४०० इतका झाला आहे. त्यात भारत एक सामना पराभूत झाला आहे. ज्यामुळे भविष्यात पुढील फेरीत जाण्याची संधी येईल तेव्हा अफगाणिस्तानच्या नेट रनरेटला तोंड देण्यासाठी भारताला मोठ्या विजयाची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button