९ एप्रिलपासून सुरु होणार आयपीएलचा हंगाम?
मुंबई: कोरोनामुळे यंदा IPL होणार की नाही आणि या स्पर्धेला प्रेक्षक असणार की नाही इथपर्यंत अनेक गोष्टींबाबत उत्सुकता आहे. यंदाच्या हंगामाच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता ही प्रतीक्षा संपणार आहे कारण आयपीएल एप्रिल महिन्यापासून सुरू होत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार 9 एप्रिलपासून 30 मे पर्यंत IPL 2021चे सामने रंगणार आहेत. या संदर्भात पुढच्या आठवड्यात महत्त्वपूर्ण बैठक देखील होणार आहे. या बैठकीमध्ये तारखा आणि वेळा निश्चित केल्या जाण्याची शक्यता आहे. इतकच नाही तर हे सामने कोणत्या शहरात कोणत्या मैदानात खेळवले जातील याचंही नियोजन करण्यात येणार आहे.
नुकतीच भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांची मालिका संपली आहे. या मालिकेत भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील आपलं स्थान निश्चित केलं. आता प्रेक्षक आणि चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती IPLची. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2021 च्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, टी -२० आणि एकदिवसीय मालिकादेखील खेळल्या जाणार आहेत. ज्यानंतर 12 दिवस म्हणजेच 9 एप्रिलपासून ही मेगा टी -20 लीग सुरू होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड विरुद्ध भारत 3 सामन्यांचे वन डे सीरिजमधील तिसरा सामना पुण्यात खेळवला जाणार आहे. 28 मार्चला एमसीए स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. तर IPL 2021 चं शेड्युल भारताच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने आणि त्या वेळा लक्षात घेऊन तयार केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन केवळ 5 शहरांमध्येच IPLचे सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद इथे हे सामने होणार आहेत. मुंबईत IPLचे सामने खेळवण्यासाठी विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता सध्या तरी मुंबईत सामने खेळवले जाण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. त्या लक्षात घेऊन चेन्नई आणि कोलकाता इथे सामने ठेवण्याबाबत चर्चा पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत करण्यात येईल. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर कोरोनाचा धोका लक्षात घेऊन IPLसाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये परवागी मिळणार की नाही याबाबतही पुढच्या आठवड्यात निर्णय येण्याची शक्यता आहे.