Top Newsराजकारण

मुख्यमंत्र्यांकडून २४ तासात जितेंद्र आव्हाडांची नाराजी दूर; टाटा कॅन्सर सेंटरला दुसरीकडे १०० सदनिका

मुंबई : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या १०० सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिलीय. १०० सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देण्यात येत आहेत. काही स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. १५ मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर २४ तासाच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद याचा आहे की, काल मिळालेल्या स्थगितीला आज तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, असंही आव्हाड यांनी म्हटलंय. दरम्यान, कॅन्सर हॉस्पिटलला दिलेल्या सदनिकांना निर्णय स्थगित केल्यानंतर या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत सत्तासंघर्ष सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. तसंच सर्वसामान्य नागरिकांकडूनही या स्थगितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आज डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या १०० खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. १६ मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. आपण आव्हाड यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यांच्याकडे तक्रारही केली होती. पण त्यांनी वेळ दिली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. चौधरी यांच्या तक्रारीवर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button