खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का, जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द

अमरावती/ मुंबई : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. नवनीत राणा या २०१९ साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या बलवान नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला.
शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना हायकोर्टानं २ लाखांचा दंडदेखील सुनावला आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघेही सध्या दिल्लीमध्ये आहेत. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारी धोक्यात असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रमाणप्रत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटं ठरलं तर संबंधित सदस्याच पद रद्द होऊ शकतं. मात्र आता नवनीत राणा यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने जरी रद्द केलं असलं, तरी राणा यांना सुप्रीम कोर्टाचा पर्याय आहे. नवनीत राणा आता सुप्रीम कोर्टात धाव घेऊन, हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात.
नवनीत राणा यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईत झाला. त्यांनी तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नवनीत राणा या मॉडेलिंग करायच्या. मात्र, २०११ साली रवी राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली होती. नवनीत राणा यांचा विवाहसोहळाही चर्चेचा विषय ठरला होता. ३१०० जोडप्यांसह त्यांनी सामूहिक विवाहसोहळ्यात नवनीत राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. या विवाहसोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.




