‘सेल्फी विथ खड्डे’वरून मनसेचा खा. सुप्रिया सुळेंना टोला
ताई, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?

मुंबई : राज्यासह मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे राज्यभरात पावसाळ्यातील खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या खड्ड्यांची दखल घेत मंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, रस्त्यातील खड्डे ही गंभीर समस्या बनली असून मनसेनं ट्विट करुन राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना जुनी आठवण करुन दिली आहे.
ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?? pic.twitter.com/nwkjr6dX0d
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 30, 2021
राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे या राष्ट्रवादीच्या मोहिमेंतर्गत रस्त्यांतील खड्ड्यांसोबत फोटो काढत राज्य सरकारचा निषेध नोंदवला होता. सध्या राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, सुप्रिया सुळे यांचे ते जुने फोटो व्हायरल होत आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही सुप्रिया सुळेंचा तोच फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. तसेच, ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.




