राजकारण

मुंबई पोलिसांकडून मानसिक छळ; रश्मी शुक्ला यांची हैदराबाद उच्च न्यायालयात धाव

मुंबई : मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी समन्स पाठवून मानसिक छळ न करण्याची सूचना मुंबई पोलिसांना करावी अशी विनंती करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

मुंबई पोलिसांचं सायबर सेल महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भातील फोन टॅपिंग प्रकरण आणि गोपनीय माहिती लीक झाल्या प्रकरणी चौकशी करत आहे. यासंदर्भात सायबर सेलनं दोन वेळा आयपीएस अधिकारी आणि गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना दोन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. याच समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. रश्मी शुक्ला यांनी आपल्या याचिकेत मुंबई पोलिसांनी धाडलेलं समन्स अवैध असल्याचंही सांगितलं आहे.

आपल्या याचिकेत रश्मी शुक्ला यांनी न्यायालयाला या प्रकरणाचे तपास अधिकारी एसीपी नितीन जाधव यांना मानसिक छळ न करण्यासाठी सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे. रश्मी शुक्ला यांचं म्हणणं आहे की, तपास अधिकारी एकापाठोपाठ एक समन्स पाठवून त्यांना त्रास देत आहेत. अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये सीआरपीएफच्या अतिरक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

२९ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत समन्स स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत प्रतिवादी म्हणून ६ लोकांना सहभागी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये यूनियन ऑफ इंडिया (डीजी सीआरपीएफ), महाराष्ट्र राज्य (चीफ सेक्रेटरी), महाराष्ट्र सरकार (अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरी गृहविभाग) , डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस कमिश्नर आणि एसीपी सायबर क्राईम जे या प्रकरणी तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांच्या एका पथकानं गेल्या सोमवारी हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांनी समन्स जारी केलं होतं आणि बुधवारी ११ वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल आणि फोन टॅपिंग प्रकरणाची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना एक ई-मेल पाठवून कोरोना प्रादुर्भावामुळं चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, असं सांगितलं होतं. त्यानंतर सायबर सेलनं रश्मी शुक्ला यांना २८ एप्रिल रोजी दुसरं समन्स पाठवत ३ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button