शिक्षण

टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

ठाणे : टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात येत आहे. खोडवेकर हे या पूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं कालच समोर आलं. पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झालं आहे.

खोडवेकर हे या पूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते. खोडवेकर यांनी शिक्षक भरती परीक्षेत घोटाळा केल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे. हा घोटाळा कसा झाला? याची माहिती खोडवेकर यांच्याकडून पोलीस काढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या घोटाळ्यात आणखी कोणते बडे मासे हाती लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या घोटाळ्यातील खोडवेकर यांच्या सहभागाबाबतची विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही.

पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी आज दुपारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक केली आहे. सुशील खोडवेकर हे आयएएस अधिकारी आहेत. ते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून कार्यरत होते. सायबर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळ्याची पाळंमुळं खोदून काढण्यास सुरुवात केली असून खोडवेकर यांना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज पर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना आज दुपारीच पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेपरीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे . घोलप याने 2020 मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्स अपवर पाठवित होता. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आले आहे.

२०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र ठरल्याचं समोर आलं आहे. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वी २०१३ पासून टीईटीच्या मार्फत भरती झालेल्या राज्यातील सर्व शिक्षकांची प्रमाणपत्रे खरी आहेत की नाही याची पडताळणी करायचं शिक्षण परिषदेने ठरवलं होतं. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, महापालिकाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांना तसे आदेश देण्यात आले. पुणे सायबर पोलिस सध्या २०१८ आणि २०२० मधे झालेल्या टीईटी घोटाळ्याचा तपास करत आहेत.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून ही आता रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.

पुणे पोलीस टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पैसै घेणाऱ्या दलालांच्या शोधात आहेत. पुणे सायबर पोलिसांच्या रडारवर टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील एजंटांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार यानं पोलीस तपासात अभिषेक सावरीकरनं पाच कोटी दिल्याची कबुली दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्या अनुषंगाने पुणे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button