राजकारण

…म्हणूनच इंदिरा गांधींनी शरद पवारांचे सरकार बरखास्त केले होते : मुनगंटीवार

गोंधळामुळे विधानसभा १० मिनिटे तहकूब

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेचे अध्यक्षपद हे एक किंवा दोन दिवसापेक्षा कधीच रिक्त राहिलेले नाही. तुमच्या सरकारने ५० वर्षे, १०० वर्षे किंवा १ हजार वर्षे राज्य करावे, पण संविधानाला तोडू नका. संविधानातील तरतूद स्पष्ट आहे, त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार ? याबाबतचे आज पत्र द्या अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्याचवेळी राष्ट्रपती राजवट लागणार नाही याची काळजी घ्या. सरकारचा पगार घेणारी व्यक्ती म्हणून हे सांगणे मला गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात अशा प्रकारे विधानसभेचे पद एक किंवा दोन दिवसापेक्षा कधीच रिक्त राहिले नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच याआधी राज्यात कधी कधी विधानसभा अध्यक्षपद रिक्त होते याचीही आठवण मुनगंटीवार यांनी करून दिली. इंदिरा गांधी यांच्या काळात शरद पवार यांचे सरकार बरखास्त करण्यात आले होते अशीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली. या चर्चेतच सुधीर मुनगंटीवार विरूद्ध नाना पटोले असा वाद रंगल्याने विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. राम मंदिराचा मुद्दा नाना पटोले यांनी मांडल्याने सभागृहात गदारोळ होतानाच जय श्रीराम अशीही घोषणाबाजी सभागृहात झाली.

महाराष्ट्राच्या इतिहासात १७ फेब्रुवारी १९८० शरद पवारांचे यांचे सरकार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केले होते याचीही आठवण सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितली. शरद पवार यांचे सरकार बरखास्त होण्यासाठी घटनात्मक सरकार अस्तित्वात न येणे, घटनेनुसार शासन व्यवस्था नीट न चालवणे ही कारणे देण्यात आली होती, असेही कारण त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपद हे ३० दिवस जरी रिक्त आहे याचे भान ठेवा, तसेच संविधान तोडू नका असेही त्यांनी सांगितले. अन्यथा राष्ट्रपती राजवट लागल्यावर पुन्हा रडू नका असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. लोकशाहीची पायमल्ली ही बहुमताच्या आधारावर करता येणार नाही असेही त्यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावून सांगितले. तसेच संविधानातील आणि लोकशाहीतील ही दादागिरी असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची तारीख द्यावी, अन्यथा परिणामांना भोगण्यासाठी तयार रहावे असेही मुनगंटीवार म्हणाले.

नाना पटोले यांनी आपल्याकडे राम मंदिरासाठी वर्गणी मागण्यात आल्याचे सांगून मला धमकी दिल्याचे सांगितले. राम मंदिराच्या विषयावर चर्चा सुरू आहे का ? असा प्रश्न करत देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला हरकत घेतली. राम मंदिरावर वेगळी चर्चा घ्या, आमची काहीच हरकत नाही असे सांगत फडणवीस यांनी मागणी केली. त्यानंतर सभागृहात जयश्रीराम जयघोष सुरू झाला. सभागृहात गोंधळ निर्माण होताच लगेचच विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button