राजकारण

ठाकरे सरकारकडून दारुबंदी उठवून काँग्रेसला ‘गिफ्ट’ : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : ठाकरे सरकारने पदोन्नतीमधील आरक्षणावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट दिलंय. आरक्षणाचा विषय सोडून देऊन दारुबंदी हटवल्यानं आनंदी व्हा असं काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सांगितलंय, अशा शब्दांत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठवण्याच्या निर्णयावर सटकून टीका केलीय. सरकारचा तर्क अजब असल्याची म्हणत अवैध विक्री होते म्हणून गांजा, ड्रग्ज, गुटखा, प्लास्टिकवरील बंदीही उठवणार का? असाही संतप्त सवाल मुनगंटीवार यांनी केलाय.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. सरकारने हा निर्णय घेताना काय तर्क लावलाय माहिती नाही. जर अवैध दारु विकली जाते म्हणून दारुबंदी हटवली असेल तर तो प्रकार वर्धामध्येही होतो. तेथे महात्मा गांधींचा आश्रम आहे ती त्यांची कर्मभूमी आहे म्हणून तिथे तसा निर्णय नाही का? सरकारचा तर्क पटत नाही.

अवैध विक्री होते म्हणून बंदी हटवायची असेल तर मग गुटखा, पानपराग, जाफरानीवर बंदी का आहे? कोणत्याही पानपट्टीवर गेलात तर मिळतं. यातून राज्याचं सरासरी १००० कोटी रुपयांचं महसूल बुडतं. मग पानपट्टीवाल्यांना अटक का करतो? प्लास्टिक बंदीने ७५० कोटी रुपयांचं नुकसान होतं. तसेच हजारो लोक बेरोजगार झाले. पण पर्यावरणासाठी आपण प्लास्टिक बंदी केली. असं असलं तरी अवैधपणे प्लास्टिक विकलं जातं. मग प्लास्टिकवरील बंदी हटवणार आहेत का? असा प्रश्न मुनगंटीवार यांनी केला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, खरंतर काँग्रेसचं सरकार असताना एक समिती तयार करण्यात आली. या समितीला 588 ग्रामपंचायतींनी दारुबंदीचे ठराव दिले. ५००० पेक्षा जास्त महिला पायी क्रांतीभूमी चिमुरहून नागपूरला गेल्या. आर. आर. पाटलांनी त्या महिलांना आश्वासन दिलं. त्यानंतर ही समिती तयार करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे, डॉ. अभय बंग हे त्या समितीचे सदस्य होते. त्या समितीने आरोग्यावरील दुष्परिणाम लक्षात घेऊन दारुबंदी केली. या जिल्ह्यात लोकांचे दारुमध्ये हजारो कोटी रुपये खर्च व्हायचे. ज्या पैशांचा लहान मुलांना खाऊ मिळावा ते पैसे कुटुंब उद्ध्वस्त करुन काही लोकांच्या पोटात जात होता.

अवैधपणे विक्री होते म्हणून बंदी हटवणार असाल तर गांजावरील बंदी हटवणार आहेत का? ड्रग्ज पार्टी अवैधपणे होतात, रेव्ह पार्टी होतात हे सुरु करणार का? या सरकारचं दारुवर खूप प्रेम आहे. कोरोनाच्या काळात सरकारने इतर निर्णय घेतलेले नाहीत, पण दारुवर यांनी घाईघाईने निर्णय घेतला, असंही मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवार म्हणाले, एकीकडे काँग्रेसचे काही नेते पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सरकारचा पाठिंबाही काढू शकतो अशी भीती दाखवत होते. अशावेळी काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट देण्यात आलंय. पदोन्नतीत आरक्षण देत नाही, पण तुमच्या मागणीनुसार दारुबंदी हटवतो. आता तुम्ही आनंदी राहा असं सांगण्याचा हा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. आता पुढची भूमिका जनतेची असणार आहे. आधी देखील दारुबंदी जनतेच्या भूमिकेतून झाली. ५८८ ग्रामपंचायतींनी ठराव केले होते. महिलांचे मोर्चे निघाले. भविष्यात लोक जसे पुढे येतील आणि दारुबंदीची मागणी करतील तेव्हा आम्ही लोकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असं मुनगंटीवार यांनी नमूद केलं.

दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे.

आबांनी आडवी केलेली बाटली, सरकारने शेवटी रिचवलीच : चित्रा वाघ

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या निर्णयावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. दिवंगत नेते आर आर आबा यांनी उभी बाटली आडवी करत आणलेली दारूबंदी ही महाविकास आघाडी सरकारने शेवटी रिचवलीच अशा तिखट शब्दांमध्ये त्यांनी दारूबंदीवर हल्लाबोल केला आहे. त्यासोबतच महिलांना आवाहनही त्यांनी सरकारविरोधात चार करण्याचेही आवाहन केले आहे. तर राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनीही या दारूबंदीच्या निर्णयाला दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button