‘द ओरिजिनल मेस्तरो आर्ट शो’ कलाप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : देशभरातील नामांकित चित्रकारांचा अनोखा कलाविष्कार “द ओरिजिनल मेस्तरो आर्ट शो” हा मुंबईत अंधेरी येथील ‘द लीला’ हया पंचतारांकित हॉटेलमधील लीला आर्ट गॅलरीत भरविण्यात आला आहे. “द ओरिजिनल मेस्तरो” हया कलाप्रवर्तक संस्थेचे संस्थापक व संचालक राजन जाधव व सह संचालक प्रवीण गांगुर्डे यांनी हया कलाप्रदर्शनाचे आयोजन केले असून हया प्रदर्शनाचे उद्घाटन बॉलीवुडमधील सुवर्णकाळातील दिग्गज गायिका उषा तिमोथी यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता नगरकर, द ओरिजिनल मेस्तरो संस्थेचे संस्थापक व संचालक राजन जाधव व प्रवीण गांगुर्डे, ज्येष्ठ चित्रकार रामजी शर्मा यांच्यासहित कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
मुंबई व विविध राज्यातील चित्रकारांना एकत्रित आणून त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणे, हा “द ओरिजिनल मेस्तरो” हया कलाप्रवर्तक संस्थेचा मुळ उद्देश आहे. नामवंत व नवोदित चित्रकारांना एकत्र आणून त्यांच्या कलेला वाव व व्यवसाय मिळवून देणे, हया हेतूने राजन जाधव व प्रविण गांगूर्डे यांनी ““द ओरिजिनल मेस्तरो” हया कलाप्रवर्तक संस्थेची स्थापना केली आहे. भविष्यात भारतातील अनेक शहरात व परदेशात कला प्रदर्शने आयोजित करण्याचा तसेच चित्रकारांना ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून त्यांची कला जगभरात पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न असून त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे.
“द ओरिजिनल मेस्तरो आर्ट शो” हया कलाप्रदर्शनात मोगलन श्रावस्ती, रामजी शर्मा, स्वाती साबळे, प्रवीण गांगुर्डे, विनीतकुमार, रसना भारद्वाज, करिश्मा वाधवा, सुबीर दास, मानव देठे, आनंद साई यांच्या समकालीन, वास्तववादी, अर्ध वास्तववादी, अमूर्त चित्र आणि शिल्पांचा समावेश आहे. हा सौंदर्यपूर्ण, बोलका व कलात्मक आविष्कार सर्वांना आवडेल असाच आहे. हे प्रदर्शन रसिकांना द लीला आर्ट गॅलरीत १२ मार्च २०२१ पर्यंत सकाळी ११ ते सायं. ७ या वेळेत विनामूल्य पाहता येणार आहे.