
मुंबई : महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा करतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आघाडी सरकार पडण्याची तारीखही जाहीर केलीय. राणे यांच्या या भविष्यवाणीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांकडून नारायण राणे आणि भाजपवर जोरदार पलटवार सुरु झालेत. गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत. मात्र, नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे यांचे आभार, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राणेवर खोचक टीका केलीय.
आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी पाच – सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे हे मी समजू शकतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे. त्यांचा पक्ष टिकवायचा असेल तर अशी आश्वासने व असं वातावरण कायम ठेवावं लागतं, असंही पाटील म्हणाले.
राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असं नारायण राणे म्हणाले. त्याचबरोबर माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठीच्या काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही. पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही, असंही ते म्हणाले.




