‘एनएसई’च्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना अटक
नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने अटक केली आहे. विशेष म्हणजे चित्रा यांचा काल अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने आज त्यांना अटक केली आहे. चित्रा रामकृष्ण या मागील २० वर्षांपासून हिमालयातील कथित योगीच्या सल्यानुसार आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेत होत्या. तसेच शेअर बाजाराशी संबंधित महत्वाची माहितीही योगीला पाठवत होत्या. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत त्या एकादाही या योगीला भेटलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली होती.
केंद्रीय तपास यंत्रणेकडून चित्रा यांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु होती. चित्रा यांनी शेअर मार्केटच्या बाबतीतले महत्त्वाचे निर्णय आपण हिमालयातील एका योगीसोबत चर्चा करुन घेतो, असा खुलासा केला होता. त्यांच्या या खुलाशामुळे शेअर मार्केटमध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली होती. पण त्यानंतर तो योगी हा दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचा माजी सहकारी असल्याचं निष्पन्न झालं. चित्रा यांना महत्त्वाचे निर्णय सूचवणाऱ्या कथित हिमालय योगी हा त्यांचा सहकारी आनंद सुब्रमण्यन हाच असल्याचं तपासात उघड झालं आहे. चित्रा यांनी त्याला गलेलठ्ठ पगारात नोकरीवर रुजू केलेलं होतं. याच प्रकरणावरुन सेबीने चित्रा यांच्यावर गोपीनीय माहिती लीक केल्याचा आरोप केला आहे. चित्रा रामकृष्णन यांच्या ईमेल तपासातून संपूर्ण घटनाक्रम समोर आला होता. आनंद आणि चित्रा यांच्यात ईमेलवर झालेल्या चौकशीतून संपूर्ण प्रकरण उघड झालं. हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपासासाठी सुपूर्द करण्यात आले होते.
सेबीने काही दिवसांपूर्वी काढलेल्या आदेशामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलं होतं. त्या आदेशानुसार, चित्रा रामकृष्णा या कथित योगीच्या सल्याने निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले. चित्रा रामकृष्ण योगीच्या संपर्कात असल्या तरी त्यांनी त्याला कधीही पाहिले नाही. हे योगी कुठेही प्रकट होऊ शकतात असा त्यांचा दावा होता.
शेअर बाजाराचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि सल्लागार आनंद सुब्रमण्यन यांच्या हायप्रोफाईल नियुक्तीमध्येही या निनावी योगीचा सहभाग असल्याचे सेबीच्या तपासात निष्पन्न झाले होते. आनंद सुब्रमण्यन यांची एनएसई समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि चित्रा चित्रा रामकृष्णन यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गंमत म्हणजे सुब्रमण्यन यांना गुंतवणूक विश्वातील कोणीही ओळखत नाही. त्यांनी २०१६ मध्ये पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या चौकशीत अनेक खुलासे समोर आले आहेत.
आनंद सुब्रमण्यम यांच्या नियुक्ती प्रकरणी सेबीने मोठी कारवाई केली होती. यात चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्यासह काही व्यक्तींना सुरक्षा कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले. चित्रा रामकृष्णन यांना ३ कोटी रुपये, प्रत्येकी २ कोटी रुपये नारायण आणि सुब्रमण यांना आणि व्हीआर नरसिंहन यांना ६ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. नरसिंहन हे एनएसईचे मुख्य नियामक अधिकारी आणि मुख्य अनुपालन अधिकारी होते.