नागपूर: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. मंडल आयोगाच्या आंदोलनात ओबीसी समाज नव्हता. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य वास्तवाला धरुन आहे. भाजप यावर राजकारण करत आहे, असं सांगतानाच आव्हाड यांच्याप्रमाणे इतरंही ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाजाला जागृत करावं. ६० टक्के ओबीसी समाज जागृत झाल्यास तो सत्ताधारी असेल, असं तायवाडे म्हणाले.
ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते. पण, त्यावेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण, त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे. पण, आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना मैदानात उतरावेच लागेल, असे आवाहन आव्हाड यांनी केले होते.
जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले जर नसते तर आज इथे कोणतीच महिला दिसली नसती. महिला कोणत्याही जातीधर्माची असली तरी ती सुशिक्षित झाली त्याचे श्रेय फक्त आणि फक्त सावित्रीमाई यांनाच जाते. कार्ल मार्क्स याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते जोतिराव फुलेच आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा ओबीसींसाठीच दिला आहे, याची जाणीव तमाम ओबीसींनी ठेवले पाहिजेत. आज ओबीसींचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे आरक्षण संपवणार्या केंद्राविरोधात ओबीसी आक्रमक होत नाहीत. आता लढण्याची वेळ आली आहे. पांगळे होऊ नका, लढा, असे आवाहनही त्यांनी यावेळेस केले.
ओबीसी एकवटू लागले आहेत, हे अत्यंत चांगले आहे. पण, राज्याने इम्पिरिकल डाटा सादर करून ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले होते. तर, ओबीसी नेतृत्व अशोक वैती यांनी, एका कार्यक्रमापुरते मर्यादित राहू नये, ठाणे ओबीसी एकीकरण समितीने यापुढेही नियमित एकत्र येणे गरजेचे आहे. जर आपण एकत्र आलो तरच ओबीसींची बिगर राजकीय ताकद उभी राहिल, असे सांगितले.