पहिली ते चौथीची शाळा दिवाळीनंतर सुरु होण्याचे संकेत
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात कोरोनाच्या दौनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. याचपाश्वभूमीवर ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु झाले असून राज्यातील महाविद्यालयांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाचे नियम पाळत सुरु करण्याची परवानगी दिली. यानंतर आता राज्यात सरसकट पहिलीपासून शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असल्याने आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठक घेतली. या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सुरू असलेल्या शाळांबाबतचा आढावा घेतला. राज्यात शाळा सुरू होऊन ३ आठवडे झाले आहेत. या तीन आठवड्याचा अनुभव लक्षात घेता राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू कराव्यात अशी भूमिका राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मांडली.
जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी लवकरच मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सबरोबरही चर्चा करणार असल्याचे सांगितले. मंत्रीमंडळ आणि टास्क फोर्ससोबत चर्चा झाल्यानंतर सरसकट शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.
वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा आग्रह बहुतेक सर्वच सीईओंनी धरला. पाचवी ते बारावी सुरू झाल्यापासून तेथे कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करतानाही वेगळ्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. टास्क फोर्सशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध संस्थाचालकांशी मी लवकरच चर्चा करणार आहे.