एमपीएससीच्या परीक्षार्थींसाठी मार्गदर्शन सूचना जाहीर
...तर पीपीई कीट घालून द्यावी लागणार एमएमपीएसी परीक्षा

मुंबई : राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचीयादी जारी केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला जर सर्दी, खोकला, ताप असेल तर त्याला पीपीई कीट घालून परीक्षा द्यावी लागणार आहे.
राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या परीक्षा पुढे ढकल्या आहेत. येत्या २१ मार्चला ही परीक्षा घेण्यात येणर आहे. १४ मार्च २०२१ रोजी लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० घेण्यात येणार होती. परंतु राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० साठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, परीक्षेच्या वेळी शारीरिक/परस्पर अंतराच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही/उपाययोजना करण्यात आली आहे. कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणाली नुसार उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
– परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना किमान तीन पदरी कापडाचा मुखपट (मास्क) परिधान करणे अनिवार्य आहे.
– परीक्षा कक्षामध्ये मुखपट ( मास्क) , हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी (पाऊच) असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य आहे.
– परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता तसेच आरोग्यास हितावह (हायजेनिक) राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.
– ‘कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांना कळवावे. अशा उमेदवारांना मुखपट, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप, इत्यादी बाबी समाविष्ट असलेले पीपीई किट
उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच, त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येईल.
– शारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे,
– भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
– परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक /परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे.
– वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, सॅनिटाईझ पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीमध्ये टाकावेत.
– कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून
– वेळोवळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना/आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.
– शारीरिक/परस्पर अंतराच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे व प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे.