राजकारण

शिवसेना हादरुन गेली आणि अग्रलेखातून जळफळाट झाला : नारायण राणे

मुंबई : कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मृत्यू सुद्धा झाले आहेत. पूरग्रस्त भागाचा दौरा राजकीय नेत्यांकडूनही करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनीही पूरग्रस्त रायगड आणि रत्नागिरीचा दौरा केला. यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून त्यांच्यावर टिप्पण्णी करण्यात आली. त्यानंतर आता नारायण राणे यांनीही ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली आहे.

नारायण राणे यांनी दोन ट्विट्स केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, “जनता आता समोर येऊन राग व्यक्त करु लागल्यामुळे शिवसेना हादरुन गेली व त्यामुळेच सामनामध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदु:खात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिद्ध होते.”

त्यानंतर नारायण राणे यांनी आणखी एक ट्विट करत म्हटलं, “लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्यांना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू.”

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांना ज्या प्रकारची मदत हवी ती केंद्राकडून मिळेल, आम्ही पहायला आलो नाही, सर्वतोपरी मदतही देणार असे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांचे हे विधान समजदार नेत्याचे नाही, पण आम्ही ते चांगल्या अर्थाने घेतो. नुकसानग्रस्तांना, पूरग्रस्तांना सर्वतोपरी केंद्र सरकार मदत करेल असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने करावे का? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button