भाजप नेते तसेच रिटा बहुगुणा-जोशी यांच्यासोबत कोणतीही चर्चा नाही : सचिन पायलट

नवी दिल्ली : राजस्थानच्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सचिन पायलट यांच्याविषयीही अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. भाजपा नेत्या रिता बहुगुणा-जोशी यांनी त्यांच्याशी बोलणं केल्याचं दावा केला होता. मात्र आता या चर्चेवर खुद्द सचिन पायलट यांनी भाष्य केले आहे.
याबाबत सचिन पायलट यांनी सांगितले की, भाजपमधील कोणासोबतही माझं बोलणं झालं नाही. रिता बहुगुणा जोशी यांनीही मला कॉल केला नाही. त्या सचिनशी फोनवर बोलल्या आहेत. मग तो सचिन तेंडुलकर असावा. माझ्याशी बोलण्याची त्यांची हिंमत नाही असा पलटवार त्यांनी केला आहे. आज संध्याकाळी ४ च्या सुमारास सचिन पायलट दिल्लीत पोहचतील. दिल्लीत भाजपा यूपीसाठी प्लॅन बनवत असताना काँग्रेसमध्ये राजस्थानच्या राजकीय हालचालींवर चर्चा होणार आहे.
सचिन पायलट हे दिल्लीत पोहचून काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रियंका गांधी आणि सचिन पायलट यांच्या बैठकीची वेळ ठरली नाही. दुसरीकडे पायलट यांच्या दिल्ली वारीमुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे टेन्शन वाढलं आहे. त्यांनी मंत्री आणि आमदारांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. मंत्री आणि आमदारांच्या प्रत्येक हालचालींबाबत डिटेल्स देण्याचं काम त्यांनी विश्वासू शिलेदारांवर सोपवलं आहे. सचिन पायलट यांच्या घरी ८ आमदारांची बैठक झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.
माजी काँग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. या राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेसमध्ये वातावरण पेटू लागलं आहे. राजस्थानच्या काँग्रेसवरही याचा परिणाम पाहायला मिळालं आहे. जवळपास १० महिन्यानंतर पुन्हा एकदा सचिन पायलट यांनी जाहीरपणे पक्षाच्या नेतृत्वासमोर नाराजी उघड केली आहे. काँग्रेसच्या ३ सदस्यीय कमिटीचा अद्याप रिपोर्ट आला नाही. १० महिने झाले तरी मला दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झाला नाही. सरकारला अडीच वर्ष झाली तरी वाद शमताना दिसत नाही
‘पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे,’ असं रिटा म्हणाल्या होत्या.




