लखनौ : उत्तर प्रदेशात पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच आता, शिवसेनाही राज्यातील सर्वच्या सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवेल, अशी घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला.
यावेळी भाजपवरही शिवसेनेने आरोप केला आहे की, भाजप सरकारच्या शासन काळात राज्यातील कायदा आणि सूव्यवस्था पूर्णपणे फेल झाली असून महिलाही असुरक्षित आहेत. दारुलशफा येथे झालेल्या या बैठकीत राज्याचे प्रमुख ठाकूर अनिल सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशातील योगी सरकार ब्राह्मणांबरोबर योग्य पद्धतीने वागत नाही. तसेच राज्यातील वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण व्यवस्थेची स्थितीही अत्यंत खराब आहे. एवढेच नाही, तर बेरोजगारी आणि महागाईनेही जनता त्रस्त झाली आहे, असेही ठाकूर म्हणाले.
देशातील पाच राज्यांत पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात उत्तर प्रदेश हे सर्वात महत्वाचे राज्य आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एबीपी सी-व्होटरने उत्तर प्रदेशात सर्व्हे केला. यानुसार, उत्तर प्रदेशात भाजपला २५९ ते २६७ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय समाजवादी पक्षाला १०९ ते ११७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, बीएसपीला १२ ते १६ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ३ ते ७ जागा आणि इतरांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे.