नवी दिल्ली : मी काय करावं हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पहावं, माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे. पण अशाही परिस्थितीत माझ्या पक्षाने मला जबाबदारी दिली, तिकडे मी असणारच आणि ती नेटाने पार पाडणार. तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही तुम्हाला काही बोललो का? आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमच बघा, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. यापूर्वी, भाजप आणि मनसेने एकत्र येऊन लढून दाखवावे, असे संजय राऊत यांनी राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसंदर्भात म्हटले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत खुले आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण अनेकविध कारणांमुळे तापल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही जोरदार झडत असल्याचे पाहायला मिळत आहे. विविध मुद्द्यांवरून एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधक सोडत नसल्याचे दिसत आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यापासून भाजप-मनसेच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या एका खुल्या आव्हानाला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून, आम्ही आमचं बघू, असे म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना, जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल, तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी. संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही पाहावी, असे खुले चॅलेंज चंद्रकांत पाटील यांनी दिले. यावर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.