सांगली : सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेत असतानाच मोठा गोंधळ झाला. भाजप कार्यकर्त्यांनी अचानक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तिथे जमलेल्या शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीत आहेत. सांगलीच्या गावागावात जाऊन ते पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. दुपारी एकच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत आले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचे निवेदनेही स्वीकारले. पण अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आणि जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केलं.
भाजप कार्यकर्त्यांनी अचानक गोंधळ घातल्याने शिवसैनिकही आक्रमक झाले. त्यांनीही भाजप विरोधात घोषणाबाजी सुरू केल्या. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘आवाज कुणाचा, शिवसेने’चा अशा घोषणा देत शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गर्दीतील लोक सैरावैरा धावू लागले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा या परिसरातून निघून गेला. तर पोलिसांनी तात्काळ धाव घेत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री गेल्यानंतरही हा गोंधळ सुरूच होता. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसून निदर्शने करत होते.
हरभट रोड येथील चौकात शिवसेना, भाजप, व्यापारी एकता असोसिएशन, सर्वपक्षीय कृती समिती, गुंठेवारी समितीसह विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी थांबले होते. त्यांच्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे हे गाडीतून उतरून येत असतानाच कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला. एकमेकांना धक्काबुक्की सुरू झाली. पोलिसांनाही हा गोंधळ थांबविता आला नाही. दोन मिनिटातच निवेदन न घेताच ठाकरे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीसाठी रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरविताच भाजपचे नगरसेवक धीरज सूर्यवंशी, मुन्ना कुरणे, दीपक माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्र्याचा धिक्कार करीत पूरग्रस्तांचा अवमान केल्याचा आरोप केला. भाजप कार्यकर्त्यांनी चौकात ठाण मांडले. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी भाजप आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेनेचे शंभोराज काटकर, विशालसिंह रजपूत, संजय काटे व इतर कार्यकर्तेही त्यांच्या दिशेने धावून आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला’, अशी घोषणाबाजी करीत भाजपची दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवून घटनास्थळापासून लांब नेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत एकमेकांशी भिडले. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले. त्यांनी आमची निवेदने घेतली नाहीत. त्याआधीच निघून गेले. हा पूरग्रस्तांचा अपमान आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री घरोघरी जावून पूरग्रस्तांचे अश्रू पुसायचे. मात्र, हे मुख्यमंत्री आमचा अपमान करून गेले, असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.
भाजपचा हा दावा मात्र शिवसैनिकांनी फेटाळून लावला. मुख्यमंत्री सकाळपासून फिरत आहेत. लोकांच्या व्यथा वेदना जाणून घेत आहेत. सांगलीतील इतर गावातील लोकांनी शांतपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली. मात्र, भाजपने निवेदन न देता स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, असा दावा शिवसेनेने केला आहे.
निवेदन देता न आल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठाण मांडले. त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला’, अशी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्याने तणाव निर्माण झाला होता. गर्दी हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
निवदेत देताना उडालेला गोंधळ पाहून मुख्यमंत्री ठाकरे हे वाहनात बसले. धामणीचे विठ्ठल पाटील हे निवेदन देण्यासाठी त्यांच्या गाडीसाठी धावले. वाहनाच्या काचेवर हातही मारला. सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकरही मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे गेले. पण तोपर्यंत ताफा निघून गेला. त्यामुळे साखळकर यांनी शंखध्वनी करीत निषेध केला. त्यांनी निवेदनही भिरकावले.