Top Newsराजकारण

इंदापूर काँग्रेस भवनावरील मालकीवरून काँग्रेस विरुद्ध हर्षवर्धन पाटील वाद पेटला !

कुलूप तोडून काँग्रेस नेत्यांचा प्रवेश; वादावादीनंतर भाजप नेत्यांनी पुन्हा टाळे ठोकले!

इंदापूर : शहरात काँग्रेस आणि भाजप यांच्यात इंदापूर काँग्रेस भवनाच्या ताब्यावरून वाद पेटला आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी १२ गुंठ्यांत असणारे इंदापूर काँग्रेस भवन हे आमचेच असून महसूल विभागाचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे, असे म्हणत काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि आमदार संजय जगताप व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी २६ जानेवारीच्या मुहूर्तावर इंदापूर काँग्रेस भवनचे कुलूप तोडत आत प्रवेश केला,

तीन वर्षापासून काँग्रेस पक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात सध्या वाद सुरू आहे. काँग्रेसने कुलूप तोडल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच इंदापूर शहरातील हर्षवर्धन पाटील समर्थक व भाजपचे पदाधिकारी यांनी तत्काळ काँग्रेस भवनजवळ धाव घेतली. त्यांनी ही प्रॉपर्टी एका प्रायव्हेट ट्रस्टची असून आपल्याकडे ताबा घेण्याचे काही कागदपत्र आहेत का? असे म्हणत आमदार संजय जगताप यांच्याशी वाद घालत काँग्रेस भवनाला पुन्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुलूप ठोकले.

यानंतर हा वाद पोलीस ठाण्यात गेला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आमदार संजय जगताप व पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र चर्चेनंतरही हा वाद मिटला नाही. १९७० सालापासून ही प्रॉपर्टी काँग्रेस पक्षाची असून २०१५ साली अवैध पद्धतीने एका प्रायव्हेट ट्रस्टची स्थापना करत इंदापूर काँग्रेस भवनाची जागा एका प्रायव्हेट ट्रस्टने घेतली होती, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. २०१९ साली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाने या काँग्रेस भवनाचा ताबा घेण्यासाठी गेले असता हे काँग्रेस भवन काँग्रेसच्या मालकीचे नसल्याचे सांगत या काँग्रेस भवनाला कुलूप ठोकले, यावरून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व काँग्रेस पक्षात काँग्रेस भवनावरून वाद पेटला, हा वाद न्यायालयात व भूमि अभिलेख उपसंचालक याच्याकडे गेला.

हा प्रकार चुकीचा असून कुलूप तोडून प्रवेश करणे हे बरोबर नाही, सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रकरण असून ही प्रॉपर्टी अध्यक्ष इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीची आहे, अखिल भारतीय काँग्रेसचा काय संबंध आहे? असा प्रश्न माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. सध्या या काँग्रेस भवनाचा ताबा आमच्याकडेच असून याच्या चाव्याही आमच्याच ट्रस्टकडे असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे.

२०१९ ला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर. इंदापूरमधील काँग्रेस भवन नक्की कोणाकडे राहणार याबाबत उत्सुकता होती, त्यामुळे २०१९ ला काँग्रेस पक्षानं भवनाचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचा पवित्रा घेतला . विशेष म्हणजे १९७६ पासून काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या नावाने नोंद असलेलं हे भवन एप्रिल २०१५ मध्ये इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे करण्यात आल्याचं समोर आलं होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button