स्पोर्ट्स

पृथ्वी शॉ-शिखर धवन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीची चेन्नईवर ७ गडी राखून मात

मुंबई : पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या सलामीवीरांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर ७ गडी राखून मात केली. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८८ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि धवन यांनी आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी १३.३ षटकांत १३८ धावांची सलामी दिली. पृथ्वीने अवघ्या २७ चेंडूत, तर धवनने ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. मात्र, ड्वेन ब्रावोने पृथ्वीला बाद करत ही जोडी फोडली. पृथ्वीने ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली, तर धवनने ५४ चेंडूत ८५ धावा केल्यावर त्याला शार्दूल ठाकूरने बाद केले. परंतु, कर्णधार रिषभ पंत (नाबाद १५) आणि मार्कस स्टोईनिसने (१४) दिल्लीला विजय मिळवून दिला.

चेन्नईने दिलेले 189 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज अर्धशतकं झळकावत विजयाचा पाया रचला. शॉ ने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होतात. तर शिखरने 54 चेंडूत 85 धावा फटकावल्या. त्यात 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता.

या सामन्यात चेन्नईचे सरसकट सर्वच गोलंदाज अपयशी ठरले. शार्दुल ठाकूरला दोन विकेट्स मिळाल्या खऱ्या परंतु त्याने 3.4 षटकात तब्बल 53 धावा मोजल्या. ड्र्वेन ब्राव्होने 4 षटकात 28 धावा देत 1 विकेट मिळवली. उर्वरीत कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने ब्राव्होव्यतिरिक्त चेन्नईच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली.

तत्पूर्वी दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नईच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. फॅफ डू प्लेसिस (०) आणि ऋतुराज गायकवाड (५) लवकर माघारी परतले. मात्र, मोईन अली (३६) आणि सुरेश रैना (५४) यांनी ५३ धावांची भागीदारी रचत चेन्नईचा डाव सावरला. तसेच अंबाती रायडू (२३), रविंद्र जाडेजा (नाबाद ३६) आणि सॅम करन (३४) यांनी चांगली फलंदाजी केल्याने चेन्नईने २० षटकांत ७ बाद १८८ अशी धावसंख्या उभारली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button