मुक्तपीठ

शीशा हो या दिल हो…

- मुकुंद परदेशी (संपर्क - 7875077728)

देवानाना नागपूरकर आपल्या दिवाणखान्यातल्या खुर्चीवर शून्यात नजर लावून बसले आहेत. पार्श्वभूमीवर लताजींचं गाणं सुरू आहे.

शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है
लब तक आते आते हाथों से साग़र छूट जाता है
काफ़ी बस अरमान नहीं, कुछ मिलना आसान नहीं
दुनिया की मजबूरी है, फिर तकदीर ज़रूरी है
ये दो दुश्मन हैं ऐसे, दोनो राज़ी हो कैसे
एक को मनाऊँ तो, दूजा रूठ जाता है
बैठे थे किनारे पे, मौजों के इशारे पे
हम खेले तूफ़ानों से, इस दिल के अरमानों से
हमको ये मालूम न था, कोई साथ नहीं देता
माँझी छोड़ जाता है, साहील छूट जाता है
दुनिया एक तमाशा है, आशा और निराशा है
थोड़े फूल हैं, काँटे हैं, जो तकदीर ने बाटे है
अपना अपना हिस्सा है, अपना अपना किस्सा है
कोई लुट जाता है, कोई लुट जाता है

गाणं सुरू असतांनाच चं. दा. कोल्हापूरकर येतात, पण हळूच दाराआड लपून उभे राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू उमटतं. गाणं संपताच ते दिवाणखान्यात प्रवेश करतात.

चं.दा. – नमस्कार नाना, कसलं चिंतन चाललंय ?

देवानाना – दादा, कसलं चिंतन करणार ? चिंता करतोय.

चं.दा. – (मनात) मला टांग मारून एकटेच धडपडाल ना ‘ सिल्वर ओक’वर तर मग चिंताच करावी लागेल.(उघडपणे) नाना, अहो मी आहे ना, सांगा कसली चिंता आहे, ताबडतोब दूर करतो.

देवानाना – (व्याकुळतेने) दादा, एक आठवडा झाला हो भेटून. अजून काहीही उत्तर नाही. हो ही नाही आणि नाही ही नाही. नकार असेल तर तसं तरी कळवावं म्हणजे माणूस दुसरं काही शोधतो.

चं.दा. – ( मिश्किलपणे) आता या वयात हे काय काढलंत नाना, कोणाला भेटून आलात ? कोणाचा होकार, कोणाचा नकार ?अहो, जरा आमच्या वहिनींचा तरी विचार करा.

देवानाना – (मनात) हा माणूस नुसता फाटक्या तोंडाचाच नाही तर सडक्या बुद्धीचासुद्धा वाटतो. (उघडपणे, उसासा टाकत) दादा, आता तुमच्यापासून काय लपवायचं , गेल्या सोमवारी ‘ सिल्वर ओक’वर गेलो होतो , बोलणी करायला. दोन चार दिवसात कळवतो म्हटले होते, अजून काही निरोपच नाही.

चं.दा. – ( मनात) मला कटवून गेला होतात ना, ‘त्यांनी’च कटवलं तुम्हाला. (उघडपणे) नाना, अहो बोलणी लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची असो की सत्तेच्या बोहल्यावर चढण्याची, सोबत न्यावं कोणालातरी ,साक्षीला. बंद दाराआड एकट्यानेच बोलणी केली, की काय होतं ते विचारा जरा तुमच्या जुन्या मित्राला .

देवानाना – (मनात) लोण्याची वाटणी करतांना बोक्याला सोबत न्यायला मी काय वेडा- विडा आहे की काय ? ( उघडपणे) न्यायचं होतं सोबत तुम्हाला दादा, पण घाईघाईत विसरलोच बघा. ‘ही’ला पहिल्यांदा भेटायला गेलो होतो ना; तेव्हाही घाईघाईत चपलाच घालायला विसरलो होतो बघा.

चं. दा. – ( मनात) तेच म्हणतो, पहिल्याच दिवशी पाणी जोखलं असेल वहिनींनी तुमचं , म्हणून तर काही चालत नाही. ( उघडपणे) चालायचंच,पण त्याच काय आहे नाना की, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. मी परत येईन, मी परत येईन,असं आपण कितीही म्हटलं तरी वेळ कुठे लवकर परत येते ? ती तिच्या वेळेवरच येते. जरा सबुरीने घ्या.

देवानाना – सबुरीने घेऊ म्हणजे काय करू दादा ?

तेव्हढ्यात कुरियरवाला एक पार्सल दादांच्या हातात देतो. पार्सल मधली वस्तू पाहून दादा मिश्कीलपणे हसतात.

चं. दा. – सबुरीने घ्या म्हणजे तोपर्यंत हे ऐका.

देवानाना – काय आहे ते ?

चं दा.- ‘मुकेश के दर्दभरे गीत’ ची सीडी आहे , तुमच्या जुन्या मित्राने, उधोजीराजेंनी पाठवली आहे तुमच्यासाठी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button