राजकारण

शरद पवार यांच्यावर आजच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया!

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्या बुधवारी त्यांच्यावर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्यांचा पोटदुखीचा त्रास बळावल्याने आजच त्यांना ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले असून आजच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आज संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. तत्पूर्वी आज दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर आज पवार रुग्णालयात अॅडमिट झाले आहेत. त्यांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शस्त्रक्रियेनंतर पवारांना ब्रीच कँडीत दहा दिवस निगरानीखाली ठेवण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दुपारी पवारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button